रेल्वे, नदी व महामार्गावरून जाणाऱ्या जवळपास १३४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या कासारवाडी-नाशिकफाटा येथील राज्यातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाला प्रतीक्षा आहे, ती नामकरणाची आणि उद्घाटनाची. हिंजवडी-चाकण हा औद्योगिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मार्ग जोडतानाच पुलामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक वेगवान होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही आमदारांचे सूत कधी जुळले नसले, तरी त्यांचे चिंचवड, पिंपरी व भोसरी विधानसभा मतदारसंघ या पुलामुळे एका रेषेत जोडले गेले आहेत.
केंद्र शासनाचा नेहरू अभियानातील निधी शहरांना मिळू लागला, त्याचा पुरेपूर लाभ पिंपरी-चिंचवडने उचलला आहे. जागतिक बँकेकडून मिळालेल्या अर्थसाहाय्यातून उभ्या राहणाऱ्या या पुलासाठी ९९ कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. ३० महिने मुदतीचे हे काम बी. जी. शिर्के कंपनीला देण्यात आले. तथापि, निर्धारित मुदत संपल्यानंतरही अजूनही पुलाची बरीच कामे प्रलंबित राहिल्याने कामाची मुदत वाढवून देण्यात आली. खर्चाचा आकडाही ९९ कोटींवरून १३४ कोटींपर्यंत वाढतो आहे. या पुलामुळे नाशिकफाटय़ाला वाहतूक नियंत्रक दिवे राहणार नाहीत. शहराचा उत्तर व दक्षिण भाग जोडला जाणार असून वाकड-भोसरी हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पूर्ण पार पडू शकणार आहे. पुणे-नाशिक व पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग तसेच भोसरी व हिंजवडीचे औद्योगिक क्षेत्र जोडले जाईल. चाकणचे नियोजित विमानतळ व मोशीतील प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या दृष्टीने हा उड्डाणपूल अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
दिलीप बंड यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकालात या पुलाची प्राथमिक मांडणी, नकाशे तयार करण्यात आले, त्यानंतर, आशिष शर्मा यांच्या काळात मान्यता मिळाली. तर, सध्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या काळात हा पूल पूर्णत्वाला येतो आहे. पुलाच्या नामकरणावरून तिढा उद्भवण्याची शक्यता आहे. वेगवेगळी नावे सुचवण्यात येत असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे. आर. डी. टाटा यांचे नाव देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. १२ डिसेंबरला पुलाचे उद्घाटन होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात, अनेक कामे बाकी असल्याने उद्घाटन इतक्यात होईल, असे दिसत नाही. पुलाचा पूर्ण वापर सुरू होण्यास बराच कालावधी जाईल, अशी शक्यता पालिका अधिकारी व्यक्त करत असल्याने पुलाला नामकरण व उद्घाटनाची प्रतीक्षा आहे.