गेल्या अनेक महिन्यांपासून हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि शासकीय यंत्रणा कामाला लागली. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांची सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर शुक्रवारी लगेचच एका संयुक्त पथकाने स्थळपाहणी दौराही झाला. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्नांचे हे सातत्य कायम राहील की यापूर्वीप्रमाणे आंरभशूरपणा करून पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती राहील, अशी साशंकता या भागातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
‘आयटी हब’ म्हणून नावलौकिक असलेल्या हिंजवडीची प्रचंड वाहतूक कोंडी होणारे गाव अशीही ओळख आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथील रस्त्यावर लाखोंच्या संख्येने वाहने येतात. त्यामुळे चहुबाजूने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यामुळे दोन ते तीन तास अडकून पडावे लागते, असा अनुभव येथून जाणारे वाहनस्वार दररोज घेत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरूवारी पालकमंत्र्यांनी या प्रश्नावर स्वतंत्र बैठक घेतली. या वेळी हिंजवडीतील वाहतूक कोंडीची कारणे व संभाव्य उपाय याचे सादरीकरण वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले. त्यानुसार, आवश्यकतेनुसार रस्तारूंदीकरण, अतिक्रमणे काढणे, अर्धवट राहिलेली रस्त्यांची कामे पूर्ण करणे, काही ठिकाणी यू-टर्न बंद करणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, भूमकर चौक ते विनोद वस्ती येथील जुना जकात नाका येथील प्रस्तावित कामांचा वेग वाढवणे, मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करणे आदी उपाययोजना प्राधान्याने करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. सविस्तर चर्चेनंतर बापट यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. पुणे व पिंपरी महापालिका, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस यांच्याशी समन्वय साधून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या सूचना राव यांना देण्यात आल्या. बैठकीनंतर लगेचच राव यांनी स्थळपाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलीस, पिंपरी पालिका व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी पाहणी करणार असून त्यानंतर बापट स्वत: पाहणी करणार आहेत.
अशी आहे उपाययोजना
हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्तारूंदीकरण, अतिक्रमणे काढणे, अर्धवट राहिलेली रस्त्यांची कामे पूर्ण करणे, काही ठिकाणी यू-टर्न बंद करणे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे, भूमकर चौक ते विनोद वस्ती येथील जुना जकात नाका येथील प्रस्तावित कामांचा वेग वाढवणे, मंगल कार्यालय चालकांवर कारवाई करणे आदी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hinjawadi traffic jam it hub police midc