हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील कंपन्यांना आगामी काळात हव्या तितक्या प्रमाणात वीजपुरवठा होऊ शकणार आहे. या ठिकाणी वीज उपकेंद्रांसह सक्षम वीज वितरण यंत्रणा उभारण्याचे काम ‘महावितरण’कडून पूर्ण करण्यात आले आहे.
महापारेषण व एमआयडीसीच्या सहकार्याने आयटी पार्कमधील टप्पा एक व दोनमध्ये २२०/२२ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्प्यासाठी त्याहून अधिक क्षमतेचे उपकेंद्र उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विजेची वाढती मागणी लक्षात घेता या ठिकाणी २२०/३३ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
आयटी पार्कच्या टप्पा एकमध्ये उभारण्यात आलेल्या उपकेंद्राच्या माध्यमातून विप्रो, इन्फोसीस, केपीआयटी, कॉग्नीजंट आदी कंपन्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. टप्पा दोनमध्ये विप्रो, इन्फोसीस, डीएलएफ, डिनॅस्टी, आयबीपीएल आदी कंपन्यांना वीजपुरवठा होतो आहे. बायोटेक्नॉलॉडी व फार्मा उद्योगांसाठी उभारण्यात आलेल्या उपकेंद्राच्या माध्यमातून एमक्यूअर, जेनोवा फार्मा, श्रेया बायोटेक, आयबीपी, इमीटेक इम्मीसन आदी कंपन्यांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. या क्षेत्रातील उद्योगांसाठी अतिरिक्त स्विचिंग स्टेशनही उभारण्यात येणार आहे.
टप्पा तीनमध्ये ब्लू चिप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विविध कंपन्यांना वीजपुरवठा होतो. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित टाटा कन्सल्टंसी सव्‍‌र्हीसेस, टेक महेंद्रा, कॉग्नीजंट आदी कंपन्यांच्या क्षेत्रामध्ये अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम वेगाने सुरू आहे. त्याचप्रमाणे विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. सध्या सर्व कंपन्यांना अखंडित व योग्य प्रमाणात वीजपुरवठा करण्यात येत आहे. आगामी काळात विजेची मागणी वाढली, तरी मागेल त्या क्षमतेचा व हवा तितका वीजपुरवठा करता येणार असल्याचे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hinjewadi it park will get abundant electricity