हिंजवडी पोलिसांनी हिंजवडी ते सुपा अहमदनगरपर्यंत तब्बल साडेतीनशे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडी पोलिसांनी १८ दुचाकी जप्त केल्या. सराईत गुन्हेगार रवी परमेश्वर धांडगे हा पाथरगव्हाण तालुका पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी राहतो. तो स्थानिकांना दहा ते पंधरा हजारांत दुचाकी विकायचा, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब असलेल्या हिंजवडीत आणि वाकडमध्ये दिवसा दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये एकच व्यक्ती बनावट चावीच्या साह्याने दुचाकी चोरी करत असल्याचं वारंवार पुढे आलं. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे आणि राम गोमारे यांच्या टीमने गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा, हिंजवडी पोलीस ठाणे ते सुपा अहमदनगर यादरम्यानचे साडेतीनशे सीसीटीव्ही तपासून आरोपी रवी परमेश्वर धांडगे याच्यापर्यंत पोलीस पोहोचले.

हेही वाचा – पुणे: येरवड्यातील खुल्या कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

रवी हा हिंजवडी आणि वाकड परिसरात दुचाकी चोरून तो मित्र विकास धांडगेच्या मदतीने पाथरगव्हाण येथील स्थानिकांना दहा ते पंधरा हजारांत विकायचा. दरम्यान, त्यांनी कागदपत्रांची मागणी केल्यास काही दिवसांमध्ये कागदपत्रे देतो असं सांगायचा. रवी हा जेव्हा दुचाकी चोरायची त्याचवेळी हिंजवडी किंवा वाकड परिसरात यायचा. मग दुचाकी चोरून तो पुन्हा त्याच्या गावी निघायचा, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणी रवी परमेश्वर धांडगे याला पाथरगव्हाण जिल्हा परभणी या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – इंदापूरमध्ये विहिरीचे काम करताना कठडा कोसळल्याने चार मजूर गाडले; ‘एनडीआरएफ’चे पथक दाखल

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, गुन्हे पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी मारणे, धुमाळ, शिंदे, केंगले, कोळी, नरळे, चव्हाण, गडदे, बलसाने, राणे, पालवे, कांबळे, पंडित यांच्या पथकाने केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hinjewadi police have arrested bike thief kjp 91 ssb
Show comments