पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होणार असल्याचा दावा प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. हा मार्ग सुरू झाला, तर येथील वाहतूक कोंडी फुटण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी आणखी आठ महिन्यांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाचे ८२ टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो मार्गिकेवरील ‘डक्ट’ टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, लोहमार्गदेखील (रुळ) टाकण्यात आले आहेत. २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), विद्याुत यंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असून, सप्टेंबर महिन्यापर्यंत ही कामे पूर्ण करून चाचणी घेण्यात येईल. येत्या ऑक्टोबरपर्यंत ही मेट्रो धावणार असल्याचा दावा मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

हिंजवडीमधील माहिती तंत्रज्ञान कंपन्या (आयटी पार्क), उद्याोगधंदे आणि शिवाजीनगरदरम्यानची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत तो विकसित केला जात आहे. भूसंपादन, परवानग्या, निविदा आणि कार्यारंभ आदेश आदी प्रक्रियेमुळे विलंब झाला असताना कंत्राटदाराकडून पुन्हा दिरंगाई केल्याने दंडाचा इशारा देण्यात आला होता.

त्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढही देण्यात आली. जुलै २०२४ पासून, कंत्राटदाराकडून वेगाने काम सुरू करण्यात आले. प्रलंबित कामांमध्ये बाणेर, सकलनगर आणि सिव्हिल कोर्ट आदी स्थानके तसेच ११ स्थानकांवर सरकते जिने आणि इतर पायाभूत सुविधांचा समावेश असून, ही कामे अंतिम टप्प्यात आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करून चाचणी घेण्याचे उद्दिष्ट प्राधिकरणाने ठेवले आहे.

२३ स्थानकांवर सुविधा

क्वाड्रॉन, इन्फोसिस फेज दोन, डोहलर, विप्रो, पल इंडिया, शिवाजी चौक, हिंजवडी, वाकड चौक, बालेवाडी स्टेडियम, एनआयसीएमएआर, रामनगर, लक्ष्मीनगर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर, भारतीय कृषी संशोधन संस्था, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय अशी २३ स्थानके आहेत. यापैकी ११ स्थानकांवर सरकते जिने आहेत. तसेच, प्रतीक्षालय, आसन क्षमता, व्यापारी संकुल, ठरावीक वाहनांसाठी सुविधा आदी नियोजन करण्यात आले आहे.

मेट्रोमुळे कोंडी फुटणार?

हिंजवडी परिसरात आयटी कंपन्या असल्याने या ठिकाणी वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. बालेवाडी, गणेशखिंड रस्ता, शिवाजी चौक, हिंजवडी उड्डाणपुलाजवळ आदी ठिकाणे प्रचंड रहदारीचे आहेत. या मेट्रो मार्गिकेमुळे वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्याची शक्यता आहे. ही मार्गिका पीपीपी तत्त्वानुसार साकारण्यात येत असून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असलेल्या ‘थर्ड रेल सिस्टीम’ आणि ‘रिजनरेटिव्ह ब्रेकिंग’ या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे. वातानुकूलित डबे आंध्र प्रदेश येथील अल्स्टॉम सुविधेत तयार करण्यात आले आहेत. या मार्गासाठी मात्र आणखी आठ महिन्यांची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.३ किलोमीटर मेट्रो प्रकल्पाचे काम ८२ टक्के पूर्ण झाले आहे. स्थानकांवरील सुविधांचे कामे अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत चाचणी घेऊन त्रुटी, अडथळे दूर करण्याचे उद्दिष्ट आहे. एकाच टप्प्यात हिंजवडी ते न्यायालय या स्थानकापर्यंत ऑक्टोबरपर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.

रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Story img Loader