पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या शिवाजीनगर-माण-हिंजवडी मेट्रोच्या पहिल्या खांबाच्या कास्टिंग कामाला गणेशखिंड रस्त्यावर प्रारंभ करण्यात आला. या मार्गिकेवरील मेट्रोच्या कामाला वेग आला असून यापूर्वीच दोन खांबांमधील सेगमेंट जोडणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.

पहिल्या खांबाच्या कास्टिंग कामाचा प्रारंभ पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पीएमआरडीएचे अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, पुणे महानगरपालिका अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा) अनिरुद्ध पावसकर या वेळी उपस्थित होते. पीएमआरडीएकडून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर शिवाजीनगर-मान-हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. ही मेट्रो मार्गिका २३.३ कि.मी.ची असून २३ स्थानके प्रस्तावित आहेत. दरम्यान, महामेट्रोच्या दोन मेट्रो मार्गिकांप्रमाणे शिवाजीनगर-माण-हिंजवडी हा प्रकल्प पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शहराच्या वेगवेगळय़ा भागांतून हिंजवडीला जाणाऱ्या अनेक आयटी कर्मचाऱ्यांना ही मेट्रो फायदेशीर ठरणार आहे. सन २०१९ पूर्वी भूमिपूजन होऊनही या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकू शकलेले नव्हते. पण आता कामाला वेग आला आहे. जागांचा प्रश्न सुटल्याने या प्रकल्पाचे काम वेळेत सुरू होणे आणि निर्धारित वेळेत पूर्ण होणे, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे

Story img Loader