पुणे : हिंजवडीतील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या केंद्राला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गाच्या कामाला आता गती मिळाली आहे. व्हायाडक्ट खांबांच्या जोडीने स्थानकाच्या इमारतीचे खांब उभारणीचे काम सुरू झालेले आहे. बाणेर रस्त्यावरील प्रस्तावित स्थानकाच्या ‘प्लॅटफॉर्म पिअर आर्म’ (पीपीए) उभारणीला गुरुवारी सुरुवात करण्यात आली.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील प्रस्तावित १८ व्या स्थानकाच्या ‘प्लॅटफॉर्म पिअर आर्म’ (पीपीए) उभारणीला आज बाणेर रस्त्यावर ‘यशदा’समोर सुरुवात झाली. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावर एकूण २३ स्थानके असतील. यापैकी प्रत्येक स्थानकासाठीच्या खांबाला कॉनकॉर्स आणि प्लॅटफॉर्म स्तरासाठी असे प्रत्येकी दोन ‘पीपीए आर्म’ असतील. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी याच दिवशी गणेशखिंड रस्त्यावर या मार्गाचा पहिला खांब उभारला गेला होता.
हेही वाचा >>> पिंपरी: शालेय जीवनातच शहरातील विद्यार्थ्यांना गंभीर आजारांचा विळखा
‘प्लॅटफॉर्म पिअर आर्म’ म्हणजे काय?
प्लॅटफॉर्म आर्म हा मेट्रो स्थानक उभारणीतील महत्त्वपूर्ण रचनात्मक घटक असतो. मेट्रो स्थानकाचा डोलारा सांभाळणाऱ्या खांबाला दोन्ही बाजूंनी झाडाच्या फांद्यांसारखे हे ‘पीपीए’ जोडले जातात. त्यांच्या पुढे उभारण्यात येणारा मेट्रो स्थानकाचा पूर्ण प्लॅटफॉर्म तोलून धरला जातो. समोरून पाहिल्यास त्याचा आकार शरीरापासून लांब पसरलेल्या दोन्ही हातांसारखा दिसतो म्हणून याला ‘प्लॅटफॉर्म पिअर आर्म’ म्हटले जाते. उन्नत प्रकारातील कोणत्याही मेट्रोसाठी प्लॅटफॉर्मचे खांब आणि पिअर आर्म उभारणे हे अतिशय किचकट काम मानले जाते.
हेही वाचा >>> मुंबई-पुणे महामार्गावर लोखंडी सळई चोरणारी टोळी जेरबंद
पुणे मेट्रो मार्ग-३ : हिंजवडी ते शिवाजीनगर
पुणे मेट्रो मार्ग- ३ हा हिंजवडीला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारा २३ किमीचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खासगी भागीदारीतून राबवला जात आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हा प्रकल्प टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (टीयूटीपीएल) आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांचा समावेश असलेल्या समूहाला दिला आहे. हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीद्वारे ३५ वर्षांच्या कालावधीसाठी विकसित करून चालवला जाणार आहे.