‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील नव्या प्रयोगामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाली आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या महिन्यात १५ डिसेंबरपासून हिंजवडी भागात पीएमपीच्या गाडय़ांसाठी तसेच अन्य प्रवासी गाडय़ांसाठी (बस) स्वतंत्र मार्गिका (लेन) सुरू केली आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचत असल्याचा अनुभव येत आहे. वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला असून, तो कायमस्वरूपी राबवल्यास हिंजवडी भागातील वाहतुकीची कोंडी निश्चितच कमी होणार आहे.

हिंजवडीतील सौंदर्या हॉटेल ते भूमकर चौक हे अंतर १.८ किलोमीटर आहे. हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी वीस ते पंचवीस मिनिटे किमान आणि अनेकदा त्यापेक्षाही अधिक वेळ लागायचा. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेच्या हिंजवडी विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी १५ डिसेंबरपासून सर्व प्रकारच्या प्रवासी गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी बॅरिकेट्स लावून एक मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचला आहे आणि कोंडीही कमी झाली आहे.

या उपक्रमासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील म्हणाले, की प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मंगळवारी बैठक झाली. हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी तसेच औद्योगिक वसाहतीचे (एमआयडीसी) अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

वाकड चौक ते हिंजवडीतील विप्रो सर्कल हे अंतर ६.२ किलोमीटर आहे. त्यातील शिवाजी चौक ते विप्रो चौक हे अंतर ४.२ किलोमीटर एवढे आहे. हा भाग जॅमिंग स्पॉट (वाहतूक कोंडी) म्हणून ओळखला जातो. हे अंतर कापायला साधारणपणे ३५ ते ४० मिनिटे लागतात. हे अंतर आता पंधरा ते सोळा मिनिटांत कापता येते. पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांनी बससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून दिल्यामुळे दुचाकी आणि मोटारींसाठीही स्वतंत्र मार्ग निर्माण झाला आहे. बस मार्गिका सोडून जात नाहीत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत नाही. सौंदर्या हॉटेल ते भूमकर चौक हे अंतर बस साडेपाच मिनिटांत पार करते, तर मोटारी आणि दुचाकी वाहने हे अंतर नऊ मिनिटांत कापतात, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. या मार्गावर डागडुजी केल्यानंतर वाहतुकीचा वेग निश्चित वाढेल. बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader