हिंजवडी आयटी पार्क येथील वाहतूक समस्येवर रस्त्याची रुंदी वाढविणे, उड्डाणपूल उभारणे या दीर्घकालीन उपाययोजना नाहीत. या ठिकाणची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पीएमपी व मेट्रोची चांगली सेवा सुरू करणे हा एकच उपाय आहे. त्यामुळे तातडीने या भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर देण्याची मागणी पादचारी प्रथम संघटनेचे प्रशांत इनामदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हिंजवडी आयटी पार्क भागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. याबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतीच बैठक घेऊन चर्चा केली. यामध्ये नेहमीच्याच रस्ते सुधार योजनांवर चर्चा झाली. रस्ता रुंदीकरण, नवीन रस्ते, उड्डाणपूल हे उपाय काही प्रमाणात आवश्यक आहेत. मात्र, हे वाहतूक समस्येवरील दीर्घकालीन पर्याय नाहीत. आयटीपार्कचा वेगाने विस्तार होत असून या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात रस्ते वाढविले तरी वाहतूक कोंडीची समस्या जाणवू शकते. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सक्षम,सोईची आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करणे हाच एक पर्याय आहे. पीएमपीची बससेवा या ठिकाणी पुरविणे ही सर्वात निकडीची गरज आहे. या ठिकाणी जाणाऱ्या बसेस या चांगल्या व सुस्थितीत हव्यात. त्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे, तर नागरिक पीएमपीने प्रवास करतील. त्याबरोबरच हिंजवडी भागाला चांगल्या मेट्रोची गरज आहे. पण सध्याच्या प्रकल्पात मेट्रोचा समावेश केलेला नाही. पुणे मेट्रोचा अहवाल सात वर्षांपूर्वी तयार केला असून त्यामध्ये हिंजवडी मेट्रोला चौथा क्रमांक देण्यात आला आहे. हिंजवडी येथील वाहतूक समस्येची बदललेली परिस्थती पाहता केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे दोन्ही मेट्रो मार्गाचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. मेट्रो मार्गात जरूर त्या सुधारणा करून पहिल्या टप्प्यातच हिंजवडीला मेट्रो द्यावी, अशी मागणीही इनामदार यांनी निवेदनामध्ये केली आहे.
‘उत्तर-दक्षिण उड्डाणपूल हेच उत्तर’
हिंजवडी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर उत्तर दक्षिण दिशेने उड्डाणपूल उभारण्याची गरज आहे. हा पूल दुमजली असण्याची गरज असून शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन वाहतूक कोंडी सोडवावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राज्यमंत्री असताना आपण देहूरोड-कात्रज महामार्गावर उत्तर-दक्षिण असा उड्डाणपूल हिंजवडी चौकात बांधण्याची विनंती केली होती. पण, त्यावेळी एमआयडीसी व औद्यागिक विभागाने पूर्व-पश्चिम असा उड्डाणपूल बांधला. पण, तुलनेने त्या पुलावरील वाहतूक कमी आणि पुलाखालच्या रस्त्यावरील वाहतूक मोठी असल्याने कोंडीत भर पडली आहे. दिवसेंदिवस ही कोंडी वाढत आहे. त्यामुळे या चौकात उत्तर-दक्षिण असा दुमजली पूल तातडीने उभारणे हा एकच पर्याय आहे. तो तातडीने उभारावा, अशी मागणी शिवरकर यांनी केली आहे.

Story img Loader