शिरुर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिलकीचा अर्थसंकल्प मांडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्युनंतर स्वराज्याचा खजिन्यात नऊ कोटी होन शिल्लक होते. त्याच्या संपूर्ण जीवनात व राज्य कारभारात कर्जबाजारीपणा किंवा बेहिशोबीपणा गलथानपणाला वाव मिळाला नाही. शिवाजी महाराज यांच्या अर्थनीतीचा अभ्यास करावा असे आवाहन प्रसिद्ध इतिहास संशोधक व व्यवस्थापन मार्गदर्शक डॉ. अजित आपटे यांनी शिरूर येथे केले.
शिवजयंती उत्सव समिती शिरूर यांच्या वतीने आपटे यांचे ‘ छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापन शास्त्र ‘ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी सरपंच वर्षा काळे, प्राचार्य द्वारकादास बाहेती, माजी नगरसेवक सुकुमार बोरा आदी उपस्थित होते. आपटे म्हणाले स्वराज्यात दर १ तारखेस वेतन व्हायचे. अनुकंपा तत्व व फमिली पेशन्स हे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लागू केले.
योग्य गोष्टी साठी योग्य तेवढाच खर्च, बचतीला काटकसरीला आणि साधेपणाला महत्व ही शिवाजी महाराजांची महत्वाची सूत्रे राहिली. स्वराज्याचे आणि स्वकार्याचे अधिष्ठान त्यांनी नेहमी बळकट ठेवले. येणे चोख वसूल करणे कोणाचे बाकी न ठेवणे यावर त्यांच्या कटाक्ष असे. ज्यांचा अर्थ बळकट त्यांचे सारेच बळकट आणि ज्यांचे अर्थ कमकुवत त्याचे सारेच कमकुवत हे लक्षात ठेवूनच शिवाजी महाराज यांनी कारभार केला असे आपटे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्याही युध्दाला धर्म युध्दांचे स्वरूप दिल नाही. त्यांनी जास्तीजास्त लढाया बुध्दीने लढल्या. गनिमी काव्याचे बाळकडू शहाजी महाराज यांच्या कडून त्यांना मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक संकटाचे रुपांतर संधीत केले. भारतीय परिस्थितिचा विचार करून त्यानी बोटी तयार केल्या. स्वप्ने व कल्पना त्यांनी वास्तव्यात आणल्या . शिवचरित्र म्हणजे विवेक असे आपटे म्हणाले .