पुणे : मीरगड म्हणजे सध्याचा पेण तालुक्यातील सोनगिरीचा किल्ला आहे, अशीच आजपर्यंत समजूत होती. परंतु, हे दोन स्वातंत गड असल्याची बाब पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरातील मोडी कागदपत्रांतून इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी केलेल्या संशोधनातून उजेडात आली आहे.मृगगड उर्फ मीरगड हा किल्ला सरसगड पाली तालुक्यात होता आणि सोनगिरी किल्ला पेण तालुक्यात असल्याने हे दोन्ही किल्ले वेगळे आहेत हे दर्शवणारी कागदपत्रे पुणे पुरा लेखागारात असंख्य प्रमाणात असल्याचे इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेमाणे म्हणाले, ‘पुणे पुरालेखागारातील मोडी कागदपत्रांतून या दोन्ही किल्ल्यांचा सर्वात जुना उल्लेख इसवी सन १७३९ च्या कागदातून दिसतो. पुढे १७३९ ते १७९२ या काळात हे दोन्ही किल्ले ओस पडले. त्यानंतर अवचित गड तालुक्यात हबशींचा उपद्रव व्हायला लागल्याने हे दोन्ही किल्ले पुन्हा वसवावे असे अवचितगडचे मामलेदार सरदार बाबुराव पासलकर यांनी पेशव्यांना कळवले. मग पेशव्यांच्या आज्ञेवरून हे दोन्ही किल्ले इसवी सन १७९३ च्या चैत्र मासात नव्याने वसवले गेले. या दोन्ही किल्ल्यांच्या बांधकामाच्या कागदांतून त्यांचा इतिहास समोर आला आहे.’ मलंगगडावरील इंग्रज विरुद्ध मराठे यांच्यात १७८० मध्ये झालेल्या लढाईचे अप्रकाशित तपशील मेमाणे यांनी मांडले. ते म्हणाले, ‘भर पावसाळ्यात झालेल्या या लढाईत किल्ल्याचे सरनौबत बहिर्जी नाईक पवार यांनी मोठा पराक्रम केला. इंग्रज सैन्य माचीवर चढून किल्ला ताब्यात घेण्यासाठी पुढे सरसावले असताना बहिर्जी नाईक पवार यांनी जीवाची पर्वा न करता इंग्रज सैन्यावर मोठमोठे दगड धोंडे फेकून सुमारे तीनशे इंग्रजांना जखमी केले. त्यामुळे इंग्रजांचा हल्ला मोडून गड सुरक्षित राहिला. इंग्रजांना माघार घ्यावी लागली होती.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History researcher raj memane research on songiri mirgad castle pune print news vvk 10 amy