पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) कोणतीही चर्चा न करता घेतला. यंदा निवडणूक वर्ष असल्याने या काळात विद्यार्थी, शिक्षक आणि अन्य घटकांच्या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, अशा सूचक शब्दांत इशारा देऊन निर्णय किमान एक वर्ष स्थगित करण्याची मागणी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाही प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी या संदर्भातील पत्र प्रधान यांना पाठवले आहे. एआयसीटीईने घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्या पत्राद्वारे प्रधान यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण संस्थांना होणाऱ्या त्रास, अडचणी याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!
हेही वाचा – अजितदादांच्या चिरंजीवाने निवडणूक लढविलेल्या मावळातून ‘घड्याळ’ हद्दपार !
एआयसीटीईने घेतलेल्या निर्णयामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अभ्यासक्रमांच्या मान्यतेची प्रक्रिया दमवणारी, अनेक प्रकारची माहिती मागणारी आहे. त्यामुळे त्याची पूर्तता करताना महाविद्यालये, शिक्षण संस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्याशिवाय या निर्णयाचा ग्रामीण, आदिवासी, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. निवडणुकीत या नाराजीचा मोठा फटका बसू शकतो, असा सूचक इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.