फलक काढताना यंत्रणांना पूर्वकल्पना न दिल्याचीही कबुली

शाहीर अमर शेख चौकातील दुर्घटनाग्रस्त फलक काढण्यापूर्वी वाहतूक पोलीस, महापालिका आदी यंत्रणांना पूर्वकल्पना दिली नसल्याची कबुली रेल्वे प्रशासनाने दिली. जाहिरात संस्थेने फलकांचे संरचनात्मक लेखापरीक्षण न दिल्याने यापूर्वी चार फलक रेल्वेच्या जागेत पाडण्यात आले आहेत. हा पाचवा फलकही रेल्वेच्या जागेतच पाडण्यात येणार असल्याने अन्य परवानग्या घेतल्या नव्हत्या. पण, तो चुकून रस्त्यावर पडला, असे वक्तव्यही रेल्वे प्रशासनाच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आले.

फलक काढण्याचे काम सरू असताना त्याचा लोखंडी सांगाडा रस्त्यावर कोसळून शुक्रवारी चार नागरिकांना जीव गमवावा लागला. त्याचप्रमाणे दहा नागरिक गंभीररीत्या जखमी झाले. याबाबत रेल्वेच्या धोरणावर कडाडून टीका झाल्यानंतर याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी शनिवारी पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात संबंधित कबुली देण्यात आली. पुणे विभागाचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आणि मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी आदी अधिकारी या वेळी उपस्थित होते.

रेल्वेच्या जागेवरील सर्व जाहिरात फलक कायदेशीर आहेत, असा दावा करून देऊस्कर आणि उदासी यांनी सांगितले की, सर्व जाहिरात संस्थांना फलकांच्या संरचनात्मक लेखापरीक्षणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. वेळोवेळी सूचना देऊनही सहा फलकांचा अहवाल सादर झाला नव्हता. त्यामुळे हे फलकच काढण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार एका संस्थेला हे काम देण्यात आले होते. त्यानुसार कोरेगाव पार्क येथील फलक काढले होते. सध्या संगम पार्कातील फलक काढण्याचे काम सुरू होते. हा फलक रेल्वेच्या जागेतच पाडण्यात येणार होता. मात्र , संबंधित संस्थेकडून हलगर्जीपणा झाल्याने चुकून फलक रस्त्यावर पडला.

मृतांच्या नातलगांना तातडीने मदत पोहोचली

फलक दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना प्रत्येकी पाच लाख, तर गंभीर जखमींना एक लाख रुपयांची मदत रेल्वे प्रशासनाने जाहीर केली होती. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बहुतांश जणांना मदतीचे धनादेश देण्यात आले. शनिवारी दोन मृतांच्या नातलगांना धनादेश देण्यात आले. इतर दोघांच्या नातलगांना धनादेश देण्यासाठी अधिकारी रवाना झाले. त्यातील श्याम धोत्रे यांच्या पत्नीकडे सध्या कागदोपत्री कोणताही पुरावा नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. जखमींनाही धनादेश देण्यात आले असून, एका नातलगांनी धनादेश स्वीकारलेला नाही. खासगी रुग्णालयात हलविण्यात आलेल्या जखमींचा सर्व खर्च रेल्वे करणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार

फलकाच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी शनिवारी रेल्वेच्या एका अभियंत्यासह दोघांना अटक केली. याबाबत रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर म्हणाले की, पोलिसांच्या तपासाला रेल्वेकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. त्यांना आवश्यक माहिती आणि कागदपत्रे दिली जातील. मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी म्हणाले की, रेल्वेकडूनही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती या प्रकरणाचा तपास करीत आहे. येत्या १५ दिवसांत समिती अहवाल सादर करणार आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्या कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.