राज्यभरात होळी हा सण साजरा होत असताना, आज(गुरुवार) पुण्यात भाजपा कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत –
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, ”वर्षभरातील सर्व वाईट प्रवृत्ती जाळण्याचं सुद्धा होळी प्रतिक आहे. त्यामुळे आज गावोगाव हे सरकार ज्या प्रकारे सामान्य माणासावर अन्याय करत आहे. म्हणजे एकाबाजूने त्यांच्याकडे आमदरांचा निधी पाच कोटी करायला पैसे आहेत. आमदारांच्या वाहन चालकांचे पगार वाढवायला पैसे आहेत. आमदरांच्या स्वीय सहायकांचे पगार वाढवायला पैसे आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत. त्यावेळी त्यांना आठवतं की करोना काळात करवसूली कमी झाली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाहीत. शेतकऱ्यांच्या वीजेची कनेक्शन तोडणार, त्यांची तीन महिने देखील वसूली करणं थांबणार नाही. महिलांवरील अन्याय, अत्याचार या सगळ्या गोष्टी पाहता. भाजपाने हा निर्णय केलाय होळी जाळायच्या निमित्त प्रातिनिधिक या सगळ्या गोष्टी जाळायच्या आणि आज पुण्यात भाजपा कार्यालयासमोर हा होळीचा कार्यक्रम झाला.”
संजय राऊतांबद्दल काही बोलायचं नाही… –
पंतप्रधा मोदींनी किती काश्मीरी पंडितांना भारतामध्ये आणलं? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊतांबद्दल काही बोलायचं नाही, काही बोलण्यात पॉईंट नाही, त्यामध्ये काही हाशील नाही. असं मी ठरवलंय. त्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर विचारू शकतात.
सत्य फार काळ दाबून ठेवू शकत नाही –
तर, द काश्मीरी फाईल्स हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मुद्य्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”काश्मीरी फाईल्समध्ये जे काश्मीरचं भीषण चित्र दाखवलय. ती वस्तूस्थिती नाही का? काश्मीरमधल्या हिंदूला पळावं लागलं नाही का? तिथील महिलांवर अत्याचार झाले नाहीत का? काश्मीर पंडितांची मालमत्ता तिथल्या स्थानिक अल्पसंख्यांकांनी हडपली नाही का? हे नाही म्हणा म्हणजे विषय संपला. या देशाचा खरा इतिहास आता या देशाच्या तरूणाईला दाखण्याची आवश्यकता आहे. सत्य फार काळ दाबून ठेवू शकत नाही.”
भाजपा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही होळी –
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया बाहेर आज होळी निमित्त केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणाचा निषेध करत होळी पेटवून निषेध नोंदविण्यात आला. तर यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.हे आंदोलन शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.