शनिवारपासून आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे सरकारी नोकरदारांसाठी आगामी चार दिवस पर्यटन प्रेमाचे ठरले आहेत. धकाधकीच्या जीवनातून मोकळीक मिळवत स्वातंत्र्यदिनापासूनचे (१५ ऑगस्ट) चार दिवस कामापासूनही स्वातंत्र्य मिळविण्याचे बेत आखण्यात आले आहेत. कोकणासह, लोणावळा, आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, अलीबाग, गणपतीपुळे अशा सर्व ठिकाणचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले आहे.
स्वातंत्र्यदिन शनिवारी आल्यामुळे नंतरचा रविवारही सुट्टी, सोमवारची (१७ ऑगस्ट) एक दिवस रजा घेतली की मंगळवारी (१८ ऑगस्ट) पारशी नववर्ष म्हणजेच पतेतीची सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार दिवस दैनंदिन व्यापापासून दूर जात पर्यटनाचा आनंद लुटण्याचे बेत आखले आहेत. चार दिवसांच्या सुट्टय़ांमुळे राज्यातील पर्यटनस्थळांबरोबरच राज्याबाहेरील पर्यटनस्थळांसह फार्म हाऊसला भेट देण्यालाही पसंती दिली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले, तरी सलग सुट्टय़ांमुळे पर्यटन व्यवसायासाठी सुगीचा हंगाम आला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाची रिसोर्ट्सची आगाऊ नोंदणी झाली असून खासगी रिसोर्ट्स आणि हॉटेलचालकांनी नेहमीच्या दरामध्येही हंगामी स्वरूपाची वाढ केली आहे. पर्यटन व्यवसाय तेजीमध्ये असल्याची माहिती खासगी सहली आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या सूत्रांनी दिली.
सध्या कोकणामध्ये भातलावणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे काहींनी पर्यटनाचा वेगळा मार्ग निवडून शेतीपर्यटनाचा मार्ग निवडला आहे. तर, काही उत्साही युवकांनी जंगल भ्रमंती, किल्ल्यांवर भटकंती आणि बाइक सफारीचेही बेत आखले आहेत. खासगी वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे जोडून सुट्टय़ा आल्यावर हौशी पर्यटक गाडी काढून फिरणे पसंत करतात. त्यामुळे घाटामध्ये कोठेही वाहन थांबवून निसर्गाचे रूप डोळ्यांत साठवून घेण्याबरोबरच धबधबे पाहण्याचा किंवा धबधब्यामध्ये चिंब भिजण्याचा आनंद लुटता येणे सहज शक्य होते.
चार दिवस ‘पर्यटना’च्या प्रेमाचे!
शनिवारपासून आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे सरकारी नोकरदारांसाठी आगामी चार दिवस पर्यटन प्रेमाचे ठरले आहेत.

First published on: 14-08-2015 at 03:13 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holiday programme