होळीच्या सणासाठी प्रदोष काल महत्त्वाचा असल्याने सोमवारी (६ मार्च) हुताशिनी पौर्णिमेला होलिका दहन करावे, असे ‘दाते पंचांगकर्ते’चे मोहन दाते यांनी सांगितले. तर, सोमवारी भद्रेवर पौर्णिमा येत असल्याने भद्रेचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी (७ मार्च) नागरिकांनी होलिका दहन करावे असे आवाहन पुण्यातील पंचांगकर्ते व खगोलशास्त्राचे अभ्यासक गौरव देशपांडे यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : पुढील शैक्षणिक वर्षापासून तिसरी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने

मोहन दाते म्हणाले, या वर्षी सोमवारी (६ मार्च) दुपारी ४ वाजून १८ मिनिटांनी चतुर्दशी समाप्ती होत असून त्यानंतर पौर्णिमा सुरू होत आहे. पौर्णिमेसाठी प्रदोष काळ महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली येथे सोमवारी सायंका‌ळी ६ वाजून १० मिनिटांनंतर सूर्यास्त होत असल्याने या राज्यांमध्ये सोमवारीच होलिका दहन करावे. तर, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये पौर्णिमा समाप्तीपूर्वी म्हणजे मंगळवारी (७ मार्च) होलिका दहन करावे. गौरव देशपांडे म्हणाले, होलिका दहन योग्य दिवशी व्हावे यासाठी नागरिकांनी सोमवारी (६ मार्च) नव्हे तर, मंगळवारी (७ मार्च) होलिका दहन करावे. ६ मार्च रोजी तिथीचा अर्था भाग असलेला करण आणि त्याचा एक भाग असलेला भद्रा येत आहे. भद्रा ही दर महिन्याच्या पौर्णिमेला येते. मात्र, पुराणात रक्षाबंधन आणि होलिका दहन या दोन पौर्णिमा भद्रेवर साजऱ्या करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. हे लक्षात घेत भद्रेचा कालावधी संपल्यानंतर नागरिकांनी ७ मार्च रोजी होलिका दहन करावे. होलिका दहन करताना पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा. यासाठी पेट्रोलचा वापर न करता तिळाचे तेल आणि गाईच्या दुधापासून बनविलेले तूप यांचा वापर करीत अग्नी प्रज्वलित करावा.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holika dahan should be on monday say mohan date of date panchang pune print news vvk 10 zws