बोलक्या रेषांतून मार्मिक भाष्य करीत चितारलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून ‘मूकनायक’ आर. के. लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आम्ही ही लक्ष्मणरेषा निश्चितपणाने आखली असल्याची ग्वाही देत पुण्यातील व्यंगचित्रकारांनी आपल्या कलाविष्काराद्वारे रविवारी ‘कॉमन मॅन’ला अभिवादन केले.
घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीने संभाजी उद्यानामध्ये आगळ्यावेगळ्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, मंगेश तेंडुलकर, चारुहास पंडित, बापू घावरे, घनश्याम देशमुख, मुकीम तांबोळी, विश्वास सूर्यवंशी आणि वैजनाथ दुलंगे यांनी कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर कॉमन मॅन रेखाटून लक्ष्मण यांना सलाम केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कोशाध्यक्ष सुनील महाजन, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि स्वागताध्यक्ष भारत देसडला या वेळी उपस्थित होते.
बाळासाहेब जेव्हा आर. के. लक्ष्मणना भेटतात..
‘पर्यावरण बिघडताच फाईल फाटू लागली, कालची जयंती आज पुण्यतिथी वाटू लागली’ या शब्दांत रामदास फुटाणे यांनी लक्ष्मण यांना काव्यांजली अर्पण केली. स्वत: कमी बोलणारे लक्ष्मण आपल्या व्यंगचित्रांतूनच अधिक व्यक्त होत असत. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी कॉमन मॅन हा सकारात्मकच दाखविला आहे, अशी भावना शि. द. फडणीस यांनी व्यक्त केली. दृश्य माध्यम असल्याने चित्रातून कमीत कमी शब्दांत नेमकेपणाने आशय मांडला जातो. त्यामुळेच लक्ष्मण यांच्या निधनानंतर त्यांच्या ‘कॉमन मॅन’ला आणि मला काय वाटले हेच मी माझ्या चित्रातून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे मंगेश तेंडुलकर यांनी सांगितले. व्यंगचित्रकलेचे दीपस्तंभ असलेल्या लक्ष्मण यांनी व्यांचित्राचा एक मापदंड घालून दिला आहे. तो कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही चारुहास पंडित यांनी दिली.