केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा हा पुणे दौरा महत्वाचा मानला जात आहे. दौऱ्यादरम्यान अमित शाहंनी भाजपा खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. पुणे दौऱ्यावर आलेल्या अमित शाह यांनी त्यांची विचारपूस केली. यावेळी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- पुणे : गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात शिरण्याचा प्रयत्न; मोटारचालक ताब्यात

घोले रोड येथील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे जाऊन अमित शाहंनी बापटांच्या तब्येतीची विचारपूस केली. काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्याने भाजपचे अनेक वरिष्ठ नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन बापट यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसतानाही बापट कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासनेंच्या प्रचारासाठी आले होते. पण नाकात ऑक्सिजनची नळी असताना गिरीश बापट यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्या हातालाही ऑक्सिमीटर लावण्यात आला होता. अशा अवस्थेतही ते भाजपाच्या प्रचारासाठी आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत होतं.

हेही वाचा- अमित शहा यांच्या संवादामुळे काश्मिरी मुले आश्वस्त; काश्मिरमध्ये ‘अमन’ आणि विकासासाठी भरीव तरतूद

मागील अनेक दिवसांपासून बापट एका मोठ्या आजाराशी लढा देत आहेत. आजारी असतानाही भाजपाने बापटांना प्रचारासाठी गळ घातल्यावरुन विरोधी पक्षाकडून भाजपावर जोरदार टीकाही करण्यात आली आहे. मुक्ता टिळक यांच्याआधी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे नेतृत्व केलं आहे. तसेच बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांची कसबा मतदार संघ आणि पुणे शहरावर मजबूत पकड आहे.