पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. कुणी यावर कौतुक केलं, तर कुणी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत स्वतः पोलीस उपायुक्तांनीच माहिती दिली होती. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर वळसे पाटलांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “ती परिस्थिती मी जाणून घेतली आहे. ती घटना घडली हे निश्चित आहे. त्यामध्ये तपास करीत असताना पोलीस आणि आरोपींमध्ये संघर्ष झाला, पण हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याच्या घटनेबाबत माझ्या हातात माहिती नाही. त्याबाबत मी जरूर माहिती घेईल.”

“वेबसाईट सुरू करून झालेली महिलांची बदनामी दुर्दैवी”

“महिलांचे फोटो एका वेबसाईटवर टाकून बदनामी करणारी घटना अतिशय दुर्दैवी आहे. सायबर पोलीस स्टेशन क्राईम ब्रँच मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. अशा प्रकारची वेबसाईट सुरू करून त्यावरून समाजातील काही विशिष्ट महिलांबाबत वाईट लिहिले जाते. त्यावर आम्ही ट्विटरला देखील लिहिले आहे. त्यांच्याकडून देखील डिटेल्स यायचे आहेत. या प्रकरणी आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती दिलीप वळसे पाटलांनी दिली.

दिलीप वळसे पाटील यांनी बैलगाडी शर्यतीवरून रंगलेल्या वादावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “बैलगाडा शर्यत जेव्हापासून बंद झाल्या, तेव्हापासून सगळ्याच प्रमुख लोकांनी बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात त्या करता प्रयत्न गेले आहेत. एक आनंदाची गोष्ट आहे की, सुप्रीम कोर्टाने निर्णय देत काही अटी आणि शर्ती घालून बैलगाडा शर्यतीना परवानगी दिली. त्यानंतर काही ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. परंतु केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार वाढत्या करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता आता जिल्हाधिकारी यांनी ऐनवेळी परवानगी नाकारली.”

“ज्यावेळी परिस्थिती पुन्हा अनुकूल होईल त्यावेळी जरूर बैलगाडा शर्यत घेतल्या जातील. कोणीही बेकायदेशीरपणे अशा शर्यती घेऊ नयेत,” असं आश्वासनही वळसे पाटलांनी दिलं.

“नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय कार्यक्रमांवर कारवाई होणार का?”

दिलीप वळसे पाटील यांना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राजकीय कार्यक्रमांवर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “कारवाई तर सर्वच ठिकाणी होणार आहे. कुठ नियमांची पायमल्ली झाली असल्यास कारवाई करणे तेथील प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांनी कारवाई करावी.”

हेही वाचा : खुद्द आयुक्त कृष्ण प्रकाश यांनीच गुन्हेगारांवर झाड फेकत आरोपींना घेतलं ताब्यात

“नेत्यांच्या मुलाच्या लग्नाला मोठी गर्दी, नेत्यांना सल्ला देणार का?”

नेत्यांच्या घरातील लग्नाला झालेल्या गर्दीवरही वळसे पाटलांनी भाष्य केलं. “नेत्यांना काही ‘स्पेशल ट्रिटमेंट’ देण्याचं कारण नाही. लग्न असो वा काहीही असो, जे नियम आणि अटी शर्ती आहेत त्या सर्वांसाठी लागू आहेत. त्याचं सर्वांनी पालन केले पाहिजे,” असं मत दिलीप वळसे पाटलांनी व्यक्त केलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister dilip walse patil comment on incident of ips krishna prakash throw tree on criminals pbs