पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी जागा आणि निधीची कमतरता आहे. मात्र, पोलिसांना चांगली व मोठी घरे देण्यासाठी गृहसचिव आणि वित्तसचिव यांची कमिटी नेमण्यात आली आहे. त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर लवकरच पोलिसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावून त्यांना मुंबईत ३५० स्वेअर फूट आणि इतर शहरात त्यापेक्षा मोठी घरे दिली जातील, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले.
पुण्यरत्न चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित ‘रणरागिणी’ पुरस्काराच्या वितरणासाठी पुण्यात आल्यानंतर पत्रकारांशी पाटील बोलत होते. पाटील म्हणाले की, पोलिसांच्या निवासस्थानांची फारच दयनीय अवस्था आहे. मुंबईसारख्या शहरात पोलिसांना १८० स्क्वेअरफूट जागेत राहावे लागत आहे. जागा आणि निधीची उपलब्धता नसल्यामुळे त्यांना चांगली घरे देण्यात अडचणी येत आहेत. मात्र, यासंदर्भात अभ्यास करून जागा आणि निधी उपलब्ध होण्यासाठी गृहसचिव आणि वित्त सचिव यांची कमिटी नेमण्यात आली आहे. त्यांच्या दोन बैठकाही झाल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर घरांचा प्रश्न मार्गी लावला जाईल. त्याचबरोबर हुडकोसारख्या संस्थेकडून कर्ज उपलब्ध होण्यासंदर्भात प्रयत्न केले जातील. व्यापारी तत्त्वावर इमारती उभारून घरांची संख्या वाढविता येईल का, याचाही अभ्यास केला जात आहे. पोलिसांना मुंबईत ३५० स्वेअर फूट आणि इतर शहरात त्यापेक्षा मोठी घरे देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईसारख्या शहरात गाडय़ांवरून स्टंटबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 पुण्यात सोनसाखळी चोरीचे प्रकार थांबविण्यासंदर्भात पाटील म्हणाले की, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात बाहेरील राज्यातून येणाऱ्या गुन्हेगारांचा हात असल्याचे आढळून आले आहे. नाशिक पोलिसांनी साखळी थांबविण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे नाशिक पॅटर्नची अंमलबजावणी राज्यात इतर ठिकाणी केली जाईल. पुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भातील निविदा अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader