कामगार मूळ गावी; खोल्या रिकाम्या झाल्यामुळे मालकांवर भाडेकरु शोधण्याची वेळ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश कामगार मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत.  जाताना कामगारांनी भाडय़ाच्या राहत्या खोल्या सोडल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरु शोधण्याची वेळ आली आहे. खोल्या भाडय़ाने देता याव्यात म्हणून इमारतींची बांधकामे करणारे व्यावसायिक तसेच घरमालक आर्थिक अडचणीत आले असून वर्षांकाठी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होणारा घरभाडय़ाचा व्यवसाय अडचणीत आला आहे.

पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामध्ये असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये नोकऱ्या करणारे बहुतांश कामगार भाडय़ाच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करतात.   मासिक भाडे देऊन कामगार आपल्या कुटुंबासह खोली घेऊन राहतात. पाच ते दहा हजार रुपये अनामत रक्कम आणि दोन हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत घरभाडे आकारले जाते.  काळेवाडी, भोसरी, चिखली, वाल्हेकरवाडी, चिंचवड, वाकड, पिंपरी, तळवडे, दिघी, सांगवी आदी परिसरात कामगार मोठय़ा प्रमाणात वास्तव्य करतात. त्या परिसरामध्ये अनेकांनी कामगारांना खोल्या भाडय़ाने देण्यासाठी चाळीवजा इमारती बांधल्या आहेत.

बहुतांश कामगारांनी खोल्या रिकाम्या केल्या आहेत. कारखाने सुरळीत होत नाहीत तोपर्यंत कामगारांनी पुन्हा गावाकडून परत न येण्याचा निर्णय घेतला आहे. परराज्यातील कामगार पुन्हा परत येतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरामध्ये खोल्या भाडय़ाने देण्याच्या व्यवसायामध्ये वर्षांकाठी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. भाडय़ाच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कामगारांकडून तीन महिने भाडे वसूल करु नये, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे भाडय़ाच्या रकमेसाठी घरमालकांना कामगारांकडे तगादा लावता येणार नाही.

करोनाच्या धास्तीने कामगार आपल्या मूळ गावी गेल्यामुळे पन्नास टक्केपेक्षा जास्त खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. अनेकांची उपजीविका भाडय़ाच्या खोल्यांवर आहे. काही घरमालकांना महिन्याला दीड ते दोन लाखांपर्यंत भाडे मिळत होते. ते आता मिळणार नाही, असे चिखली येथील नितीन मोरे यांनी सांगितले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीनंतर भाडेकरुंनी खोल्या रिकाम्या केल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून खोल्या रिकाम्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यानंतर अजूनपर्यंत भाडेकरु मिळाले नाहीत. 

रामदास यादव, चिखली, पिंपरी चिंचवड

कुदळवाडी भागात सत्तर टक्के कामगारांनी खोल्या रिकाम्या केल्या आहेत. सर्व कामगार मूळ गावी परतले आहेत. कामे नसल्यामुळे कामगारांकडून थकीत भाडे वसूल केले नाही.   वर्षभर भाडेकरु मिळण्याची शक्यता कमी आहे. यातून कोटय़वधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

दिनेश यादव, कुदळवाडी, चिखली

करोनाच्या धास्तीने परराज्यातील तसेच राज्यातील कामगार गावी परतले आहेत. त्यामुळे खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे आर्थिक गणिते बिघडणार आहेत.

राजाभाऊ धायगुडे, तळवडे

टाळेबंदी झाल्यानंतर अनेक कामगारांनी गावी जाण्याची तयारी केली होती. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांना गावी जाता येत नव्हते. सरकारने परवानगी दिल्यानंतर कामगार रेल्वेने, खासगी बसने मूळ  गावी पोचले आहेत. गावी जाताना त्यांनी भाडय़ाच्या खोल्या रिकाम्या केल्या आहेत. पुन्हा येणार की नाही याबाबत ठोस माहिती दिली नाही.

अंकुश जाधव, जाधववाडी, चिखली

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home rental business in pimpri chichwad face financial difficulties zws