टपाल कार्यालयातील बचत खात्याचे विवरण खातेदारांना घरबसल्या मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खातेधारकांना खात्याचा तपशील मिळावा, यासाठी नेट बँकिंग मोबाइलद्वारे ई-पासबुक सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खातेधारक नोंदणीकृत मोबाइल क्रमांक वापरू शकतील. या सेवेसाठी शुल्क आकारले जाणार नाही. ई-पासबुक सेवेअंतर्गत खातेदार सर्व राष्ट्रीय बचत योजना खात्यांचे विवरणपत्र पाहू शकतात. बचत खाते, सुकन्या समृद्धी खाते, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यामधील शेवटचे दहा व्यवहार प्रदर्शित केले जातील. त्याचप्रमाणे या दहा व्यवहारांची माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे: ‘पीएमपी’चे ग्रामीण भागातील अकरा मार्ग बंद; उद्यापासून अंमलबजावणी
ई-पासबुकची लिंक – इंडिया पोस्ट (https://www.indiapost.govin/Financial/Pages/Content/Post-Office- Saving-Schemes.aspx या लिंकवर) आणि http://www.ippbonline या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा भविष्यात ‘पोस्ट इन्फो’ या ॲपवरही उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक डाकघर बी. पी. एरंडे, यांनी दिली. सर्व खातेधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.