चॉकलेट हा असा खाद्यपदार्थ आहे की, तो कोणाला आवडत नाही असे होत नाही. प्रीती मेहेंदळे आणि दीप्ती हिवाळे या बहिणींना चॉकलेट घरी तयार करण्याची आवड. आपल्या या छंदालाच त्यांनी आहावा चॉकलेट्स या नावाची कंपनी सुरू करून व्यवसायात रूपांतरीत केले. चॉकलेटसाठी आवश्यक घटकपदार्थ विकत घेऊन घरगुती स्वरूपात विविध आकारांची, चवींची चॉकलेट्स तयार करून कंपनीतर्फे त्यांची विक्री केली जाते. कोणत्याही कार्यक्रमात भेटवस्तू म्हणून देण्यासाठी चॉकलेट हा उत्तम पर्याय आहे. हे लक्षात घेऊन छंद आणि व्यवसाय यांची उत्तम सांगड प्रीती आणि दीप्ती यांनी घातली आहे. पुणे, मुंबई, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या चॉकलेट्सना मागणी आहे.
दीप्ती हिवाळे आणि प्रीती मेहेंदळे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये आहावा चॉकलेट्स या कंपनीची स्थापना केली. दीप्ती पेशाने शिक्षिका आहेत, तर प्रीती यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. छंद म्हणून घरगुती स्वरूपात दोघीही चॉकलेट्स तयार करायच्या. आपल्या छंदालाच व्यवसायाचे स्वरूप दिले तर, या कल्पनेतूनच आहावा चॉकलेट्सची स्थापना झाली. प्रीती पूर्ण वेळ व्यवसाय करत असून दीप्ती त्यांची नोकरी सांभाळून प्रीती यांना सहकार्य करतात. पुण्याबरोबरच मुंबई, नाशिकसह संपूर्ण राज्यभरातून कंपनीच्या चॉकलेट्सना मागणी आहे. दहा चॉकलेटच्या एका बॉक्सपासून चॉकलेटचा गुच्छ तसेच विविध आकारातील चॉकलेटचा पुरवठा कंपनीकडून मागणीनुसार केला जातो. लग्न, अन्य कार्यक्रम, कॉर्पोरेट इव्हेंट्स यासाठीही कंपनीच्या उत्पादनांना मागणी आहे. पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उत्पादनांची विविधता आहे. व्हॅलेंटाइन डे, दिवाळी, नाताळ आणि उत्सवांमध्ये कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी असते.
अनेकजणांना चॉकलेट भेट म्हणून देता येतात, चॉकलेटचे बुकेदेखील असतात, याची कल्पना नसल्यामुळे प्रीती आणि दीप्ती यांना सुरुवातीला त्यांच्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार करावा लागला. सुरुवातीला मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना चॉकलेट्स देण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू मागणी वाढत गेली. विशेष म्हणजे प्रीती व दीप्ती यांचा व्यवसाय वाढत गेल्यानंतर त्यांच्या ओळखीच्या तीन जणांनीदेखील स्वत: घरी चॉकलेट तयार करून विकण्यास सुरुवात केली आहे. पहिली मागणी एका मित्राकडूनच आली. तर, कंपनी स्थापन केल्यानंतर पहिल्याच दिवाळीमध्ये भेटवस्तू म्हणून मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच कंपनीच्या चॉकलेट्सना मागणी आली. सद्य:स्थितीत पुणे, मुंबई, नाशिक येथून कंपनीच्या उत्पादनांना मागणी आहे.
आम्हा दोघींना चॉकलेट तयार करण्याची लहानपणापासूनच आवड होती. घरच्या घरी तयार केलेली चॉकलेट अनेकजणांना आवडत असत. हल्ली भेटवस्तू म्हणून चॉकलेट देण्याची क्रेझ आहे. त्यातूनच आपल्या छंदाला व्यवसायात रूपांतर करण्याचा विचार आमच्या दोघींच्या मनात आला आणि व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. सर्वसामान्यपणे चॉकलेट विकत घेऊन खाण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. त्यामुळे भेटवस्तू म्हणूनही चॉकलेट देऊ शकतो, ही कल्पना रुजवण्यासाठी काही काळ जावा लागला. सुरुवातीच्या काळात आमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना आम्ही तयार केलेली चॉकलेट्स द्यायचो. त्यानंतर तोंडी जाहिरातीतूनच उत्पादनांचा प्रचार व प्रसार होत गेला आणि मागणी येऊ लागली, असे प्रीती सांगतात.
कंपनीच्या उत्पादनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेज तयार केले आहे. या माध्यमातूनही मागणी येत असते. याबरोबरच मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उत्पादने ठेवली जातात. या माध्यमातूनही सुरुवातीला जाहिरात केली. कंपनीचे ग्राहक मुख्यत: लहान मुले, महाविद्यालयीन युवक-युवती आहेत. याबरोबरच गेल्या काही महिन्यांपासून मोठमोठय़ा कंपन्यांचे कार्यक्रम, सण व उत्सवांनिमित्त सर्वसामान्य नागरिकही चॉकलेट खरेदीला पसंती देत आहेत. भेटवस्तू म्हणून द्यायचे आहे त्यांना चॉकलेट्स आपलेसे वाटावेत, यासाठी आपला ग्राहकवर्ग ओळखून कंपनीकडून उत्पादनांच्या चवी, आकार, पॅकिंग यात आवश्यक बदल केले जातात. डार्क, व्हाइट, मिल्क चॉकलेट्स, मॅन्गो, ऑरेन्ज व स्ट्रॉबेरी चॉकलेट्स, फ्रीट अॅण्ड नट, बटरस्कॉच, गुलकंद बाइट्स, कोकोनट बाउन्टी, लालीपॉप्स, ओरिओ टफल, क्रॅकर्स, कॉफी, हनी, ब्लॅक अॅण्ड व्हाइट, साखरविरहित चॉकलेट अशी विविध प्रकारची चॉकलेट कंपनीकडून तयार केली जातात. तसेच लिक्विअरमध्ये वाइन चॉकलेट्स, वोडकामध्ये रम चॉकलेट्स, विस्की चॉकलेट, रोस्टेड अलमंड रोस्टेड कॅश्युनट, रोस्टेड पिस्टॅशिओ ही चॉकलेट्स कंपनीची विशेष उत्पादने आहेत.
प्रीती आणि दीप्ती घरीच चॉकलेट्स तयार करतात. चॉकलेट तयार करण्यासाठी लागणारी कोको पावडर आणि इतर साहित्य बाजारातून आणले जाते. त्यानंतर प्रत्यक्ष चॉकलेट तयार होण्यासाठी कमीत कमी एक दिवसाचा कालावधी लागतो. त्यानंतर मागणीनुसार बुके, सिंगल चॉकलेट्स तयार केली जातात. त्यानंतर पॅकिंग करून संबंधितांपर्यंत पोहोचवली जातात. मोठय़ा प्रमाणात मागणी असल्यास किमान एक आठवडा आधी ऑर्डर घेतली जाते आणि किरकोळ स्वरूपात असल्यास दोन दिवसांतही चॉकलेट तयार करून दिली जातात. पॅकिंगही दीप्ती, प्रीती स्वत: करतात. उत्पादन आकर्षक होण्यासाठी लॉलीपॉप, हार्टशेप, स्टार अशा विविध आकारांमध्ये चॉकलेट तयार केली जातात.
कॉर्पोरेट कंपन्यांचे इव्हेंट्स, दिवाळी, नाताळ यासाठी मोठय़ा स्वरूपातील मागण्या घेण्याकडे आगामी काळात कंपनीचा कल राहणार आहे. त्याबरोबरच विविध प्रकारची, आकाराची चॉकलेट एकत्रितरीत्या ग्राहकांना पाहता येतील यासाठी कंपनीचे एखादे आउटलेट उघडण्याचाही आमचा मानस आहे, असे दीप्ती सांगतात.
prathamesh.godbole@expressindia.com