पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण केलेल्या होनाजी तरुण मंडळाने यंदा नव्याने संहारक गणेश मूर्ती साकारली असून, माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (१ फेब्रुवारी) या नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.युवा शिल्पकार विराज खटावकर यांनी इपोक्सी पॉलिस्टर रेझिनचा वापर करून फायबर ग्लासमध्ये ही हुबेहूब मूर्ती घडविली आहे. होनाजी तरुण मंडळाच्या सव्वाशेव्या वर्षानिमित्त नवीन गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवून त्याचे काम विराज खटावकर यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी अवघ्या दोन महिन्यांत ही मूर्ती साकारली आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष राहुल आलमखाने, कार्याध्यक्ष भाऊसाहेब भोकरे आणि उत्सवप्रमुख जितेंद्र शिलारखाने उर्फ जवान बासुंदीवाले यांनी दिली.

राक्षसाचा संहार करणारे गणनायक अशा पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण गणेश मूर्तींमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, छत्रपती राजाराम मंडळ, हत्ती गणपती मंडळ, खडीचे मैदान येथील तरवडे गणपती आणि होनाजी तरुण मंडळ अशा गणेश मूर्तींचा समावेश होतो. होनाजी तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीमध्ये राक्षसाचा संहार करतानाचा आवेश आणि गणरायाच्या चेहऱ्यावरील हावभाव साकारणे हे शिवधनुष्य पेलण्याचे खडतर काम गणरायानेच माझ्याकडून करून घेतले, अशी भावना शिल्पकार विराज खटावकर यांनी व्यक्त केली.

अशी घडली नवी गणेश मूर्ती

गणपतीच्या मूर्तीचे थ्री डी स्कॅन करून संगणकावर प्रतिमा साकारण्यात आली

प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा साचा तयार करून त्यामध्ये इपोक्सी पॉलिस्टर रेझिनच्या द्रावणाचे ओतकाम करण्यात आले.

फायबर ग्लासमध्ये मूर्ती साकारण्यात आली.

इपोक्सी पॉलिस्टर रेझिनच्या द्रावणाचे ओतकाम केल्यामुळे ऊन आणि पावसाचा कोणताही परिणाम या मूर्तीवर होणार नाही.

या नव्या गणेश मूर्तीला किमान दोनशे वर्षे काहीही होणार नाही. या मूर्तीला रंगकाम करण्याची गरज भासणार नाही.

Story img Loader