पुणे : ‘डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकवल्या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. नाशिकमधील दोन मोबाइल क्रमांक सापडले असून, संशयित मोबाइल क्रमांकांची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डाॅ. प्रदीप कुरुलकर यांना झारा दासगुप्ता असे नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेने जाळ्यात अडकवले. त्यांना जाळ्यात अडकवून दासगुप्ताने कुरुलकर यांच्याकडून गोपनीय माहिती मिळवली. कुरुलकर यांनी दासगुप्ताचा मोबाइल क्रमांक ब्लाॅक केला. तेव्हा तिने दुसऱ्या एका क्रमांकावरून संपर्क साधला होता. संबंधित मोबाइल क्रमांक नागपूरमधील असल्याचे तांत्रिक तपासात उघडकीस आले आहे. त्या मोबाइल क्रमांकाचा वापरकर्ता बंगळुरूतील हवाई दलाच्या तळावरील कनिष्ठ कर्मचारी निखिल शेंडे असल्याचे उघडकीस आले हाेते.

हेही वाचा >>> ‘हनी ट्रॅप’साठी शेंडेच्या मोबाइलचा वापर? कुरुलकरांच्या मोबाइलच्या तपासणीत छडा; पॉलिग्राफ चाचणी करण्याचा एटीएसचा निर्णय

कुरुलकर प्रकरणात आणखी दोन संशयित मोबाइल क्रमांक मिळाले असून, मोबाइल क्रमांक नाशिकमधील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. एटीएसच्या नाशिक येथील पथकाकडे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. नाशिक येथील मोबाइल क्रमांकाचे वापरकर्ते कोण आहेत, या दृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून तांत्रिक विश्लेषणात नाशिकमधील दोन मोबाइल क्रमांक आढळून आले आहेत.

आठ जणांचा जबाब

कुरुलकर प्रकरणात आतापर्यंत आठ जणांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. समाजमाध्यमातील संवादांचे विश्लेषण करण्यात आले आहे. कुुरुलकर यांच्या मोबाइल क्रमांकाचे, तसेच त्यातील माहितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानंतर दिघीतील संरक्षण आणि संशोधन कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. कुरुलकर यांच्या कार्यालयातील तीन अधिकारी आणि एका व्यक्तीचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honey trap case leads to nashik two suspect mobile numbers found pune print news rbk 25 ysh