रुपेरी पडद्यावर झगमगणाऱ्या कलाकारांचा सन्मान सर्वत्रच होतो. मात्र, नाटक असो किंवा चित्रपट उभे राहण्यासाठी झटणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचा प्रथमच सन्मान बुधवारी (४ नोव्हेंबर) होणार आहे. कलासंस्कृती परिवार संस्थेने हा योग जुळवून आणला असून कायम पडद्यामागे राहून चित्रकर्मीना आयुष्यभर मदतीचा हात देणारे चारुदत्त सरपोतदार यांना विशेष कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या स्टार्स ‘ऑफ’ स्क्रीन पुरस्कार कार्यक्रमास प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पॉटबॉय, लाइटमन, सेटबॉय, ड्रेसमन, प्रॉडक्शन असिस्टंट, प्रॉडक्शन मॅनेजर, आर्टिस्ट को-ऑर्डिनेटर या विभागामध्ये प्रत्येकी दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. चित्रपट निर्मिती आणि यशामध्ये तेवढेच महत्त्वाचे योगदान देणारे पडद्यामागचे कष्टकरी मात्र अशा कौतुक आणि प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन सन्मान करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती कलासंकृती परिवारचे मेघराज राजेभोसले यांनी शनिवारी सांगितले.
चित्रीकरणासाठी लोकेशन उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणारे युवराज शहा, कायदेशीर सल्लागार अॅड. प्रताप परदेशी, विद्युत सामग्री साहाय्य करणारे जयंत थत्ते, भोजनव्यवस्था करणारे ‘पूना बोर्डिग हाउस’चे सुहास उडपीकर, कपडेपट पुरवठा करणारे ‘जाधव नाटय़संसार’चे विश्वास जाधव यांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor artists charudatta sarpotdar