फ्लोरल सुजर्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवाळीचा दीपोत्सव घराघरात साजरा होत आहे. सुटय़ांचे वेध लागले की धकाधकीच्या जीवनातून कुटुंबीयांसमवेत विरंगुळ्याचे चार क्षण सगळ्यांनाच हवे असतात मग निसर्गाच्या कुशीत जाण्याचे बेत आखले जातात, एकत्रित येऊन सहली आयोजल्या जातात, काही जण कृषी पर्यटनाचा पर्याय शोधतात. निदान एखादा दिवस पिकनिकला तरी जातात. प्रयोगशीलतेतून असेच एक नंदनवन उभे राहिले नाशिकमध्ये. निसर्गस्नेहाचा हा काव्यात्म आविष्कार ‘फ्लोरल सुजर्न’ म्हणजे फुलांच्या सान्निध्यातील एक दिवस.

झाडे लावणे, त्याचे नियोजन करणे, रोपवाटिकांची निर्मिती, त्यांची निगा ठेवणे अशा अनेक आघाडय़ा यशस्वीपणे सांभाळणारे उद्यानशास्त्र तज्ज्ञ प्रमोद फाल्गुने यांनी वीस वर्षांपूर्वी वडिलोपार्जित जमिनीत गहू, हरभरा, भुईमूग लावतानाच निसर्ग संवर्धनसाठी वनश्री निर्माण केली. उद्यान तज्ज्ञ म्हणून नाशिक महानगरपालिकेत काम केले. अनेक उद्यानांची रचना केली. उद्यानात सुनियोजित रचना, फुलांचे ताटवे, हिरव्या भिंती, मखमली हिरवळ, कारंजी असे अनेक घटक येतात पण या सर्वाना नियोजनपूर्वक फाटा दिल्याचे इथे फिरताना जाणवते. निसर्गाचा रानवा व गोडवा जपलेले हे उपवन आहे. रस्त्यालगत उतारावरून आपण हिरव्या राईत प्रवेश करतो. अन् मग भेटतात साग, शिवण, महागोनीसारखे वनवृक्ष, तामण, बहावा, पाचुंदा सारखे पुष्पवृक्ष, वड, औदुंबर, पिंपळ, निंब असे धार्मिक वृक्ष, चाळीस प्रकारचे निव्वळ फळवृक्ष! ‘‘सौंदर्यवर्धन, उपयुक्तता व विविधता जपण्यासाठी सुरुवातीलाच आदर्श लागवड आराखडा केला. ज्यात वृक्षांचे गटरोपण, रस्त्याच्या दुतर्फा व चतु:सीमा भोवतीचे वृक्षरोपण यासाठी जागा ठरवल्या,’’ असे प्रमोद यांनी सांगितले. मातीचे रस्ते, पाऊलवाटा, बसायचे दगडी चौथरे, झाडांभोवतीचे पार अगदी वृक्षांना बांधायच्या झोपाळ्यांचेही नियोजन केले. त्यामुळे वृक्षतोड न करता त्यांचे प्रदर्शन सान्निध्य, त्यांचे सौंदर्य व सावली याचा मला व इतरांनाही आनंद मिळतो अन् मला उत्पन्नही, असे ते हसतच सांगतात.

आंबा व भेरली माडाचे गटरोपण केले आहे. तीन प्रकारच्या तुतींचे वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा आहेत. सहसा न आढळणारी गोड पांढरी तुती आहे. अ‍ॅम्फी थिएटर म्हणजे जांभूळ वृक्षाचे गटरोपण आहे. खाया वृक्षाचे गोलाकार रोपण करून मधे मनोरंजनासाठी बसायला जागा केली आहे. खाया वृक्षांचा डौल बघण्यासारखा आहे. लहानपणी शाळेच्या बाहेर खाल्लेल्या लाल चिंचेचे वृक्ष आहेत. जे क्वचितच बघायला मिळतात. याची रोपं करून ते वाटून टाकतात. चिंच हळू वाढणारी म्हणून मध्ये शेवगा लावून उत्पन्न घेतात. एकीकडे साग व नारळ हिरवाईत भर घालतात. पानगळीच्या ऋतूत झाडे उघडी बोडकी दिसतात म्हणून त्यावर बोगनवेल, आयपोमिया, मधुमालती, पॅशनफ्रूटच्या पुष्पलता लावल्या आहेत. वृक्षलतांचे हे मनोहारी सहजीवन फुलल्यावर बघणारा लुब्धच होतो. प्रयोगशीलता हा त्यांचा आणखी एक पैलू. ते सांगतात, ‘‘ताड खरे तर कल्पवृक्ष पण त्याची रोपं सहज मिळत नाहीत म्हणून खूप प्रयोग करून रोपं तयार करण्याचं तंत्र आत्मसात केलं. ही प्रक्रिया मजेशीर असते. ताडगोळ्याच्या फळातून मांसल सोंड निघते, जमिनीत खोल जाते, त्यातून गर्भ जमिनीत खोलवर जाऊन रुजतो,’’ अशी खूप रोपं करून वाटली.

जमिनीचा सामू जास्त असल्याने आंब्याचे कलम रुजत नव्हते, मग हरसुलच्या जंगलातून दणकट वाढलेल्या आंब्याच्या झाडाच्या कोया आणून खड्डय़ात लावल्या. त्याला कलमी आंब्याचे थेट कलम केले पण कलमीचे रोपही तसेच ठेवले. ‘काडी’ रोपापासून वेगळी न केल्याने दुहेरी मुळांद्वारे पोषण होऊन रोपं १०० टक्के जगली. प्रयोग यशस्वी झाला, असे नमूद करतात. रोपवाटिकेत पिशवीत रोपं फार मोठी झाली तर मुळांचे वेटोळे होते किंवा ती जमिनीत जातात. वृक्षरोपणासाठी दहा-बारा फूट वाढलेली रोप चांगली जगतात म्हणून त्यांनी नवीन पद्धत विकसित केली. गोल ड्रमच्या खालचा तळ काढून सरकती चकती घालून त्यात गांडूळखत घालून रोप १०/१२ फूट वाढवली. हे रोप ड्रममधून काढताना खालच्या चकतीवर दाब देऊन अलगद काढता येते. याचे प्रात्यक्षिक दाखवले. बागेत अशी रोपं वाढवून ते वाटतात. शिर्डी येथील मंदिरातील कडुलिंबाच्या लिंबोळ्यापासून रोप करून साईलिंग लावला आहे. ज्यांची श्रद्धा असेल त्यांना याची रोपं देतात. फालसाचे देखणे छोटेखानी वृक्ष हे इथले आकर्षण. याची मधुर फळे, सुंदर पाने, पिवळी फुले सगळेच सुंदर.

या उपवनाच्या उभारणीत साथ आहे मितभाषी, मृदुभाषी, अगत्यशील स्मिताताईंची. इथले व्यवस्थापन त्या बघतात. काळ्या मातीच्या प्रेमात आकंठ बुडलेल्या दिसतात. वृक्षवेलींनी वेढलेली पत्र्याची कुटी हेच आनंदी घर. भपका नाही. कृत्रिम सोयी नाहीत. निसर्गातून आनंद मिळवा हा दोघांना आग्रह. त्यासाठी प्रमोद ‘शिवारफेरी’ घडवतात. प्रत्येक झाडाची वैशिष्टय़पूर्ण गोष्ट सांगतात. वृक्षराजींनी वेढलेल्या ‘प्रथम्स नेस्ट’ या ट्री हाउसमध्ये पाहुण्यांची व्यवस्था करतात.

या उपवनात झाडांचा प्रचंड पाला पडतो. या वर्षी ट्रॅक्टरला रोटोवेटर लावून त्याचा चुरा केला व जमिनीत मिसळला. एका पावसात दळदार माती झाली, असे नवनवीन प्रयोग हा यांचा ध्यास. निसर्गसान्निध्याने स्वत:ला व इतरांना समृद्ध करणे हेच यांचे ध्येय. पुढच्या पिढय़ा ते जपत आहेत म्हणूनच हे साध, निसर्गवेडे दाम्पत्य माझा आदर्श आहे.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)