महिला परिषद, महिलांविषयीच्या प्रश्नावर चर्चासत्र, आरोग्य तपासणी, स्वरक्षणासाठी प्रशिक्षण व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील अनेक संस्था, संघटनांच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने महिला शक्तीला सलाम करण्यात आला.
स्त्री आधार केंद्राच्या वतीने ‘निर्भया २०१३ घटनेनंतरचे कायदे बदल व पुढील दिशा’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या प्रवक्तया डॉ. नीलम गोऱ्हे, सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. सुलोचना हर्षे, अॅड. राजेश कोतेरे यांनी त्यात मार्गदर्शन केले. केंद्राच्या विश्वस्त शोभाताई कोठारी, लताताई वाटविसावे, मीना इनामदार, व्यवस्थापक चित्रा कवाष्टे आदी या वेळी उपस्थित होत्या. संतुलन संस्थेच्या वतीने ‘संतुलन कष्टकरी महिला परिषदे’चे आयोजन करण्यात आले. डॉ. सुलभा शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी मते व्यक्त केली. संस्थेच्या महासचिव पल्लवी रेगे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
कर्तृत्ववान महिलांविषयीचे प्रदर्शन
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने जया पानवलकर यांचे ‘स्त्रियांमधील सुप्त गुण’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थिनी व प्राध्यापकांकडून कर्तबगार महिलांविषयीच्या माहितीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विदुला सोहोनी, स्वाती मोरे, डॉ. अरुंधती शिंदे आदींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
शहर महिला काँग्रेसच्या मार्केट यार्ड ब्लॉक अध्यक्षा राधिका मखामले यांच्या वतीने ‘महिलांवरील अत्याचार, बलात्कार व महिलांनी घ्यायची खरबदारी’ या विषयीच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा डॉ. स्नेहल पाडळे, कल्पना उनवणे, सीमा पवार, कल्पना पांगसे आदी या वेळी उपस्थित होत्या. डॉ. पाडळे यांच्या वतीने गुलटेकडी येथे दोनशेहून अधिक महिलांची मोफत नेत्रतपासणी करून अल्पदरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या वतीने आदर्श शिक्षिका विनिता भालेराव यांचा मुकेश धिवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महिलांचा सत्कार
नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या वतीने महिला सुरक्षिततेविषयी पोलिसांना निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे नोकरी करून घर सांभाळणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. शोषण मुक्ती दलातर्फे महिला जागृती मेळावा घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गोखले, कमलताई भालेराव, पांडुरंग भालेराव, आशा धोत्रे या वेळी उपस्थित होते. भारतीय स्त्री शक्ती जागरणच्या वतीने डॉ. अनिल अवचट यांचे ‘तरुणाईची व्यसनाधीनता-वास्तव व उपाय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. संघटनेच्या अध्यक्षा शालिनी बापट, वैजयंती ढवळे या वेळी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने सावित्रीबाई फुले प्रशालेतील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
महिलांची आरोग्य तपासणी
पुणे नवनिर्माण सेवा संघाच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यात ३६० महिलांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार देण्यात आले. अध्यक्ष अजय पैठणकर, अमिषा गोळे यांनी संयोजन केले. प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या वतीने आळंदीतील जागृती अंध मुलींच्या शाळेत फळे वाटप करण्यात आले. संघटनेच्या जिल्हा महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी संयोजन केले. शुक्रवार पेठेतील जय अंबामाता संस्थेच्या वतीने महिलांसाठी व्यावसाय प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा मंगल नागुल यांनी शिबिरात मार्गदर्शन केले.
ज्युडो कराटेची प्रात्यक्षिके
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे ‘महिला सशक्तीकरण आणि सबलीकरण’ या विषयांतर्गत महिलांसाठी स्वरक्षणार्थ कविता नावदे यांनी ज्युडो कराटेचे प्रात्यक्षिक दाखविले. प्राचार्य डॉ. प्रदीप माने, प्रा. दीपाली मोरे, यशा सारडे आदी या वेळी उपस्थित होते. ओम अष्टांग योग साधना या संस्थेच्या वतीने कात्रज येथे नूतन योग वर्गाचे योजन करण्यात आले. डॉ. धनंजय शिरोळकर व डॉ. अत्रे यांच्या हस्ते वर्गाचे उद्घाटन झाले. योग वर्गाच्या संस्थापिका नूतन कुलकर्णी यांनी या वेळी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा