पुणे : दांडियात हुल्लडबाजी करणाऱ्यांना समज दिल्याने तिघांनी दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना बिबवेवाडी भागातील सुखसागरनगर परिसरात घडली. पसार झालेल्या आरोपींचा बिबवेवाडी पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार कदम (वय ३३, रा. सुखसागरनगर, कात्रज) याने याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> वीज तोडण्याची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची साडेसात लाखांची फसवणूक
कोजागरी पौर्णिमेनिमित्त सुखसागरनगर भागात दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी तिघे जण दांडियात आले. त्यांनी दांडियात हुल्लडबाजी करून त्रास देण्यास सुरुवात केली. कदम आणि नागरिकांनी तिघांना समज दिली. दांडियात हुल्लडबाजी करू नको, असे सांगून तिघांना जाण्यास सांगितले. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तिघे जण सुखसागरनगर भागातील श्री एकमुखी दत्त मंदिर परिसरात आले. त्यांनी तुषार कदम आणि त्याचा मित्र योगेश दत्तात्रय नाईकडे (वय ३८) यांच्यावर कोयत्याने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास करत आहेत.