लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या याचिकांवर आज मंगळवारी (४ मार्चला) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील आणि सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही याचिका दहाव्या क्रमांकावर असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या याचिकेवर मागील आठवड्यात २५ फेब्रुवारीला सुनावणी होणार होती. २९ व्या क्रमांकावर ही याचिका होती. न्यायालयाने दुपारी एक वाजेपर्यंत आठ याचिका ऐकल्या. त्यानंतर कामकाज संपताना राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ४ मार्च तारीख मागितली. त्यावर न्यायालयाने विचार करू, असे म्हटले होते.

त्यानुसार आता दहाव्या क्रमांकावर ही याचिका आहे. यामध्ये महापालिकेचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी दाखल केलेली याचिकाही असून, केसकर यांचे वकील श्रीरंग वर्मा यांनी मंगळवारी न्यायालयाने सुनावणी घेण्याची माहिती दिल्याचे केसकर यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे संकेत दिले होते. गेल्या महिन्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मे महिन्यात निवडणुका होतील, असे सांगितले होते.

त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यातच आता न्यायालयाने सुनावणीसाठी तारीख दिल्याने मंगळवारी निवडणुकांबाबत काही निर्णय होईल का? याची उत्सुकता राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.