इंदापूर : विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीकडे मार्गक्रमण करणाऱ्या संतशिरोमणी तुकाराम महाराज पालखीमध्ये बेलवडी येथे अश्वांसह वैष्णवजनांनी गोल रिंगणाचा सोहळा अनुभवला. ’रिंगण सोहळा पाहिला म्या डोळा’ अशीच वारकऱ्यांसह नागरिकांची भावावस्था झाली होती. अंथुर्णे या गावी पालखीचा मुक्काम आहे.
सणसर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा सोमवारी सकाळी मार्गस्थ झाला. पालखी मार्गातील बेलवाडी येथे पहिले गोल रिंगण होणार असल्याने वैष्णवांमध्ये उत्साह संचारला होता. बेलवडी येथे पालखी सोहळा पोहोचताच प्रमुखांनी गोल रिंगण सोहळ्यासाठी सर्वांनी सज्ज होण्याचा इशारा केला. पाहता पाहता सारे वैष्णव शिस्तबद्ध पद्धतीने रिंगणासाठी सज्ज झाले. चौघड्यासह पालखी रथाने प्रथम रिंगण पूर्ण केले. यावेळी मचाले कुटुंबीयाच्या मेंढ्यांनी रिंगण पूर्ण केले. नंतर झेंडेकरी महिला भगिनींनी प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यापाठोपाठ डोईवर पाण्याचा हंडा आणि तुळशी वृंदावन घेऊन निघालेल्या वैष्णव भगिनींनी आपले रिंगण पूर्ण केल्यानंतर पखवावादक वारकरी वादन करतानाच एका लयीत धावले. त्यानंतर टाळकरी आणि वीणेकरी धावले. आता सर्वांचे लक्ष मानाच्या अश्वाकडे लागले होते. वायू वेगाने आलेल्या मानाचा अश्वाने रिंगण पूर्ण करताच देवाच्या अश्वाने धाव घेतली. रिंगणामध्ये या दोन्ही अश्वांची भेट होताच वारकऱ्यांसह भाविकांनी हरिनामाचा जयघोष केला. पोलिसांनाही या भक्तिरसात चिंब होण्याचा मोह आवरता आला नाही. अमृता भोयटे या पोलीस महिलेने फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. अश्वाच्या टापेखालील धूळ वारकऱ्यांनी कपाळी लावल्यानंतर पुन्हा एकदा हरिनामाचा गजर झाला आणि रिंगण सोहळा पूर्ण झाला.
हेही वाचा >>>अखेर ठरलं! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलबाबत मोहोळांची मोठी घोषणा
रिंगण सोहळ्यानंतर पालखीने अंथुर्णे गावाच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोडा विसावा घेऊन ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषात पालखी सोहळा मुक्कामासाठी अंथुर्णे गावी विसावला. सणसर येथील जाचक वस्ती येथे शरयू फाउंडेशनच्या वतीने वारकरी बंधू-भगिनींना पावसाळ्यात रेनकोट आणि फराळाचे वाटप करण्यात आले. ॲड. तेजसिंह पाटील, विक्रम निंबाळकर, विजय शिंदे, सुभाष शिंदे, श्रीनिवास कदम, दीपक निंबाळकर, ऋतुराज निंबाळकर,अभय काटे आणि अविनाश भास्कर यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.