पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरप्रकारांची मालिका गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या गैरप्रकारांनंतर वैद्यकीय शिक्षण विभागासह रुग्णालय प्रशासनाने प्रत्येक वेळी कारवाई करण्याऐवजी मौन धारण करण्याची भूमिका घेतली आहे. आताही रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी तोंडावर बोट ठेवले आहे.
ससून रुग्णालयातील गैरप्रकार वाढत असल्याने रुग्णालयातील गैरकारभार वारंवार समोर येत आहे. त्यामुळे रुग्णसेवेपेक्षा ससून वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत येत आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात तत्कालीन अधीक्षक डॉ. अजय तावरे यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्या वेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे होते. त्यानंतर डॉ. काळे यांची बदली झाली. डॉ. काळे यांची गेल्या वर्षी पुन्हा अधिष्ठातापदी नियुक्ती झाली. त्यानंतर महिनाभरात डॉ. काळे यांनी डॉ. तावरेंची अधीक्षकपदी पुन्हा नियुक्ती केली.
हेही वाचा >>> ‘ससून’मध्ये दररोज २४ रुग्णांचा मृत्यू! गेल्या वर्षभरात राज्यात सर्वाधिक ८ हजार ८७५ जण रुग्णालयात दगावले
डॉ. तावरे यांच्याकडे न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार असतानाही त्यांच्याकडे अधीक्षकपद सोपविण्यात आले. त्या वेळी वैद्यकीय शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. कारण डॉ. तावरे यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात अद्यापपर्यंत ‘क्लीनचिट’ मिळालेली नाही.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्णाला उंदीर चावल्याचे प्रकरण यंदा एप्रिलमध्ये घडले आणि डॉ. तावरेंचे अधीक्षकपद काढून घेण्यात आले. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी थेट आदेश काढून ही कारवाई केली होती. त्यावर कार्यवाही करण्याऐवजी डॉ. काळे यांनी डॉ. तावरे यांनी पद सोडू नये, असा आदेश सुरुवातीला काढला. नंतर त्याच दिवशी अधीक्षकपद सोडून डॉ. यल्लाप्पा जाधव यांना पदभार सोपविण्याचा आदेश डॉ. काळे यांनी दिला. एवढ्यावरच न थांबता, ‘डॉ. जाधव यांच्या नियुक्तीचा पुनर्विचार करावा,’ असे गोपनीय पत्रही डॉ. काळे यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना लिहिले होते. त्यामुळे डॉ. काळे हे डॉ. तावरेंना पाठीशी घालत असल्याची चर्चा ससूनमध्ये सुरू आहे.
हेही वाचा >>> ससूनच्या चौकशी समितीचा बिर्याणीवर ताव अन् रुग्णालयातील परिचारिकांपासून कर्मचारी उपाशी…
आता डॉ. तावरे यांना कल्याणीनगर अपघातातील रक्त नमुन्यांची अदलाबदल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी डॉ. काळे यांनी मौन धारण केले आहे. पोलिसांनी याबाबत आपल्याला कळविले नाही, अशी भूमिका त्यांनी सुरुवातीला घेतली. ससूनमधील वाढत्या गैरप्रकारांबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे विचारणा केली असता, या मुद्द्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ससूनमधील वाढत्या गैरप्रकारांबाबत वरिष्ठ पातळीवरूनच मौन धारण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागात राजकारणाला जोर
वैद्यकीय शिक्षण विभागात मागील काही काळापासून दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकांवर कुरघोड्या करीत आहेत. या कुरघोड्यांच्या केंद्रस्थानी दुर्दैवाने ससून रुग्णालय आहे. ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी आपल्या गटातील व्यक्तीची नियुक्ती व्हावी, यासाठी प्रत्येक वेळी मोर्चेबांधणी केली जाते. त्याचबरोबर एकमेकांची जुनी प्रकरणे उकरून काढून लक्ष्य करण्याचे प्रकार सुरू आहेत. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक नेमण्यावरूनही एकमेकांवर कुरघोड्या केल्या जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
© The Indian Express (P) Ltd