पुणे : पुणे महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याचा आदेश दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाने त्याला विरोध केला आहे. अनामत रक्कम न घेण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसून, अशी सक्ती करता येणार नाही, अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीस पैशांअभावी उपचारास नकार दिल्याच्या दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी गदारोळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमबाबत नुकताच अनामत रकमेबाबतचा आदेश काढला. त्यात रुग्णालयांनी रुग्णाशी सौजन्यपूर्ण व्यवहार करणे आणि आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णाकडून अनामत रक्कम न घेणे, असे दोन प्रमुख मुद्दे होते.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणी आणि महापालिकेने खासगी रुग्णालयांना दिलेला आदेश या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांची बैठक इंडियन मेडिकल असोसिएशनची पुणे शाखा आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने घेतली. या बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आंदोलन आणि रुग्णालयाचे करण्यात आलेले नुकसान याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. रुग्णालयाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली असून, त्याआधी त्यांना दोषी ठरवू नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
महापालिकेने बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टमधील नियम ११ (जे) मधील तरतुदीचा चुकीचा अर्थ काढला आहे. या कायद्यात रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास मनाई करण्यात आलेली नाही. आपत्कालीन स्थितीत आलेल्या रुग्णावर प्रथमोपचार करणे रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्यामुळे अनामत रक्कम न घेण्याची सक्ती रुग्णालयांवर करता येणार नाही. महापालिकेच्या आदेशामुळे कोणत्याही शस्त्रक्रियेआधी अनामत रक्कम देऊ नये, असा गैरसमज पसरला आहे. वास्तविक पाहता नियोजित शस्त्रक्रियेआधी रुग्णाला अंदाजित खर्चाचा तपशील देणे रुग्णालयांसाठी कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
खासगी रुग्णालयांची भूमिका
– चौकशी पूर्ण होण्याआधी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवू नये.
– डॉ. सुश्रुत घैसास यांची प्रथमदर्शनी चूक दिसत नाही.
– महापालिकेने कायदेशीर तरतुदीची चुकीचा अर्थ काढला.
– नियोजित शस्त्रक्रियेआधी खर्चाचा तपशील सांगणे रुग्णालयांसाठी बंधनकारक आहे.
– संपूर्ण प्रकरणामुळे छोट्या व मध्यम रुग्णालयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आंदोलन आणि त्यादरम्यान केलेले नुकसान यामुळे छोट्या आणि मध्यम रुग्णालयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपत्कालीन स्थितीत आलेला रुग्ण दाखल करून घेण्याबाबतही रुग्णालयांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. कायदेशीर तरतुदींचा चुकीचा अर्थ लावून खासगी रुग्णालयांवर अनामत रक्कम न घेण्याची सक्ती केली जात आहे. – डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय सचिव, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया
© The Indian Express (P) Ltd