‘रुग्णालयांचे व्यावसायीकरण अपरिहार्य आहे. मात्र या व्यवसायात गैरप्रवृत्तींना थारा नको. प्रामाणिकपणा आणि पारदर्शीपणा सांभाळूनही हा व्यवसाय करता येतो ’, असे मत ‘वैद्यकाच्या बाजारात मी कुठे?’ या परिसंवादात विविध वक्तयांनी व्यक्त केले.
समकालीन प्रकाशनातर्फे डॉ. श्रीराम गीत यांनी लिहिलेल्या ‘वैद्यकाचा बाजार’ या पुस्तकाचे रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष डॉ. माया तुळपुळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. के. एच संचेती, डॉ. ह. वि. सरदेसाई, डॉ. चारुदत्त आपटे आणि ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक आदींनी आपली मते व्यक्त केली.    
पाठक म्हणाले, ‘‘आजची रुग्णालये चकचकीत ‘मॉल्स’ झाली आहेत. रुग्णालयांतील दुकानांतूनच औषधे विकत घ्यायला रुग्णांना भाग पाडले जाते. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात सेवा मिळावी अशी तरतूद असूनही तिचे पालन होताना दिसत नाही. बहुसंख्य धर्मादाय रुग्णालये औषधांची बिले खरेदी किमतीने देत नसल्याचे दिसून आले आहे.’’
संचेती म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा वाढली की त्याची ‘इंडस्ट्री’ होणारच. या गोष्टीचा रुग्णालयाच्या बाबतीतही स्वीकार व्हायला हवा. मात्र वैद्यकीय सल्लागारांना लठ्ठ पगारावर नोकऱ्या द्यायच्या आणि त्यांना ‘ठराविक कालावधीत ठराविक शस्त्रक्रियांची संख्या पूर्ण केलीच पाहिजे’ असे ‘टारगेट’ नेमून द्यायचे, अशा विपरीत गोष्टींना या इंडस्ट्रीत थारा नको. रुग्णालयांना औषधे ज्या किमतीला मिळतात त्यात व औषधांच्या किरकोळ किमतीत खूप तफावत असते. ही तफावत दूर करण्यासाठी औषधांची ‘मॅग्झिमम कॉस्टिंग प्राईज’ म्हणजे कमाल आकारणी किंमत निश्चित करायला हवी.’’
डॉ. आपटे म्हणाले, ‘‘मेंदू आणि हृदयासारख्या शस्त्रक्रियांसाठीच्या उपकरणांवर कोटींच्या घरात गुंतवणूक करावी लागते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा रुग्णांना मिळायचा असेल तर सेवेच्या किमती वाढणारच. रुग्णालयाचे व्यावसायीकरण अपरिहार्य आहे. पण ते चांगल्या प्रकारे करता येते. अनेक रुग्णालये गरीब रुग्णांसाठीच्या ‘इंडिजंट पेशंट फंडा’पलीकडे जाऊनही सामाजिक उपक्रम राबवतात. यंत्रणेतील काही डॉक्टर्स गैरप्रकारांत सहभागी असू शकतात, मात्र त्यांच्यामुळे संपूर्ण यंत्रणाच चुकीची आहे असे म्हणणे योग्य नाही. ’’
सरदेसाई यांनी सांगितले की,‘‘डॉक्टरांमध्ये आपण हा व्यवसाय कोणत्या उद्देशाने करीत आहोत याबाबत स्पष्टता हवी. त्यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग रुग्णाला मदत करण्यासाठी करायला हवा. शुल्क भरण्याचा शब्द देऊन तो न पाळणारे रुग्णही आढळतात. या व्यवसायात ‘विकणारा’ आणि ‘विकत घेणारा’ या दोघांनीही आपल्या नैतिक मूल्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’’