पुणे : आरोग्य व्यवस्थेत कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. कृत्रिम प्रज्ञाआधारित ‘रिमोट मॉनिटरींग सिस्टिम’ (आरएमएस) आणि ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’च्या (ईडब्ल्यूएस) साहाय्याने ‘स्मार्ट वॉर्ड’ उपक्रम रुग्णालयात राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रुग्णाच्या बिघडणाऱ्या स्थितीची आधीच पूर्वसूचना मिळत असून, त्याद्वारे तातडीने उपचार शक्य होत आहेत. संचेती हॉस्पिटलने पुण्यात सर्वप्रथम हा उपक्रम सुरू केला आहे.

डोझी कंपनीने स्मार्ट वॉर्ड तंत्रज्ञान विकसित केले आहे. याबाबत डोझीचे भारतातील प्रमुख कौशल पांड्या म्हणाले की, रुग्णालयात अतिदक्षता विभागातील रुग्णशय्यांची संख्या अतिशय मर्यादित असते. त्यामुळे प्रकृती गंभीर असलेल्या सर्वच रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करता येत नाहीत. या परिस्थितीत ‘स्मार्ट वॉर्ड’ हे तंत्रज्ञान साहाय्यकारी ठरणार आहे. रुग्णालयातील सर्वसाधारण कक्षामध्ये कृत्रिम प्रज्ञाधारित ‘बॅलिस्टोकार्डिओग्राफी’ (बीसीजी) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याद्वारे रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. रुग्णाच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलांची माहिती डॉक्टर आणि परिचारिकांना तातडीने मिळते. यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलांची पूर्वसूचना मिळून त्यावर वेळेत उपचार करणे शक्य होते.

हेही वाचा – पुणे : मोटारीच्या धडकेत पाळीव श्वानाचा मृत्यू, स्वारगेट भागातील घटना

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड : लिव्ह इन रिलेशनमधील प्रेयसीची हत्या; मुलाला सोडलं आळंदीत बेवारस

संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सने अत्याधुनिक सुविधा असलेल्या संचेती ॲडव्हान्स्ड आर्थो केअर हॉस्पिटलची घोषणा केली आहे. या ३०० रुग्णशय्येच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधेत रुग्ण सुरक्षेसाठी पुण्यातील पहिला ‘स्मार्ट वॉर्ड’ उपक्रम सुरू केला आहे. याबाबत संचेती ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पराग के. संचेती म्हणाले की, रुग्णांसाठी अधिक चांगले परिणाम मिळविण्यासाठी विदाचलित तंत्रज्ञान, प्रतिक्रियात्मक वैद्यकीय सेवांचा वापर केला जात आहे. प्रतिबंधात्मक व सक्रिय आरोग्य सेवा प्रारूपाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. या ‘स्मार्ट वॉर्ड’ उपक्रमाअंतर्गत बिगर-आयसीयू रुग्णशय्या या अत्याधुनिक होतील. त्यामुळे रुग्णाच्या महत्त्वाच्या वैद्यकीय निकषांवर देखरेख ठेवून गरज पडल्यास योग्य वैद्यकीय सेवा देता येतील.

‘स्मार्ट वॉर्ड’मध्ये काय?

  • रुग्णशय्येखाली सेन्सरचा वापर
  • रुग्णाच्या हृदयाचे ठोके, श्वसन यावर देखरेख
  • कोणत्याही बाह्य उपकरणाविना रक्तदाबाची माहिती
  • शरीरातील ऑक्सिजन पातळीची तपासणी
  • ईसीजीमध्ये चढउतार झाल्यास तातडीने संदेश
  • मोबाइल उपयोजनावर डॉक्टरांना रुग्णाची स्थितीची माहिती
  • रुग्णाची तब्येत बिघडण्याचा १६ तास आधी अंदाज