‘शिवशक्ती संगम’साठी पाच महिन्यांपूर्वी मारुंजीत आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथील प्रगतिशील शेतकरी राजेश भुजबळ यांच्या घरी मुक्काम केला. तेव्हा भुजबळ कुटुंबीयांच्या पाहुणचाराने ते प्रभावित झाले. तेथून परतताना नागपूरला येण्याचे निमंत्रण त्यांनी भुजबळ कुटुंबीयांना दिले होते. त्यानुसार, आठवण
ठेवून त्यांनी भुजबळांना नागपूरला बोलावले. मित्रपरिवारासह नागपूरला गेलेले भुजबळ सरसंघचालकांनी केलेल्या आदरातिथ्यामुळे भारावून गेले.
िहजवडीलगत मारुंजी येथे तीन जानेवारीला झालेल्या संघाच्या ‘शिवशक्ती संगम’ महासंमेलनासाठी भागवत आले होते. तेव्हा त्यांनी भुजबळ यांच्या घरी मुक्काम केला होता. दीड दिवसाच्या वास्तव्यात सरसंघचालकांनी भुजबळ कुटुंबीय तसेच त्यांच्या नातेवाइकांशी आत्मीयतेने चर्चा केली होती. लहान मुलांना गोष्टी सांगितल्या होत्या, तर वडीलधाऱ्यांशी शेतीविषयक चर्चा केली होती. भोजनासाठी घरगुती जेवणाची अपेक्षा व्यक्त करतानाच झोपण्यासाठी केवळ सतरंजीचा वापर करणाऱ्या भागवत यांची साधी राहणी पाहून भुजबळ कुटुंबीयांनाही आश्चर्य वाटले होते. तेथून परतताना भागवत यांनी भुजबळ कुटुंबीयांना नागपूरला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, काही कालावधी लोटल्यानंतर भुजबळ यांना संघ कार्यालयातून दूरध्वनी आला व त्यांना नागपूरला आमंत्रित करण्यात आले. त्यानुसार, भुजबळ दोन दिवसांसाठी नागपूरला गेले. त्यांच्यासमवेत चेतन काळभोर, चेतन भुजबळ, राजू गोरे, युवराज बोराटे, चंद्रकांत ताजणे होते.
विमानतळावर उतरल्यापासून या पाहुण्यांना मिळालेले आदरातिथ्य त्यांच्या दृष्टीने अविस्मरणीय होते. याबाबतची माहिती भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. विमानतळावर स्वागतासाठी संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते. पुष्पगुच्छ देऊन स्वागत केल्यानंतर त्यांना संघ कार्यालयात नेण्यात आले. निवासासाठी सुसज्ज खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यांना कार्यालयाची सविस्तर माहिती देण्यात आली. नंतर सरसंघचालकांची भेट झाली. त्यांच्यासमवेत विविध विषयांवर पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेत मुक्कामाच्या दिवशी झालेल्या चर्चेचा संदर्भ होता. मुलांचा अभ्यास कसा चालला आहे, वडिलांचे शेतीत काय सुरू आहे, अशी आस्थेने चौकशी करतानाच पुढच्या वेळी सर्व कुटुंबीय जेवायला या, असे निमंत्रण भागवत यांनी भुजबळ यांना दिले. भुजबळ यांनी घरून नेलेली आंब्यांची टोपली तसेच चितळय़ांची बाकरवडी भागवत यांना दिली, तर भागवत यांनी स्वामी विवेकानंद आणि भारताच्या इतिहासाशी संबंधित १० पुस्तकांचा संच त्यांना दिला.