‘पुणे महानगरपालिकेने बरीच रुग्णालये बांधून ठेवली आहेत. मात्र त्या फक्त इमारतीच राहिल्या आहेत. ही रुग्णालये सुरू करण्यात पालिकेला काय समस्या आहे ते कळत नाही. पालिकेला ही रुग्णालये चालवण्यास जमत नसेल तर ती त्यांनी चालवायला द्यावीत; किमान तिथे वैद्यकीय सुविधा तरी सुरू होतील,’ अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.
सुयोग ग्रुप आणि लायन्स क्लबच्या वतीने शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या ‘भरतपुष्प डायलिसिस केंद्रा’चे रविवारी वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. सुहास परचुरे, सुयोग ग्रुपचे अध्यक्ष भरतभाई शहा, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल राज मुछाल या वेळी उपस्थित होते. या डायलिसिस केंद्रात दहा डायलिसिस उपकरणे असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील व्यक्तींना येथे ४५० रुपयांत डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.   
वळसे पाटील म्हणाले, ‘‘ सरकारी रुग्णालयाला बाहेरून मदत मिळाली तर वर्तमानपत्रांकडून सरकारी रुग्णालय कुणाला आंदण दिले आहे का, अशी प्रतिमा निर्माण केली जाते. मदत बाहेरून मिळाली तरी शेवटी पायाभूत सुविधा उभ्या राहणे महत्त्वाचे असते. त्यामुळे सरकारी निधीवर अवलंबून असणाऱ्या रुग्णालयांनी केवळ सरकार निधी देत नाही, अशा समस्या मांडण्यापेक्षा समाजातील दानशूर व्यक्तींकडून निधी उभा करावा.’’
शासनाचे आयुर्वेदाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे डॉ. परचुरे यांनी सांगितले. रुग्णालयात रजिस्ट्रार, हाऊस मेन या पदांवर काम करणाऱ्या व्यक्तींना तसेच लेखनिक वर्गाला शासनाकडून अत्यल्प वेतन मिळत असल्याने कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत असल्याचे ते म्हणाले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा