पुण्यातील ४१ रुग्णालये कॅशलेस सेवेच्या यादीत समाविष्ट असल्याचे विमा कंपन्यांतर्फे ‘इन्श्युरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी’ला (आयआरडीए) सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या यादीतील सर्व रुग्णालये कॅशलेस सेवा पुरवत नसल्याचे समोर येत आहे. यातील काही रुग्णालयांनी किरकोळ ग्राहकांना कॅशलेस सेवा पुरवण्याचे बंद केले आहे, तर काही रुग्णालये केवळ ग्राहक टिकवण्यासाठी नाईलाजास्तव विमा कंपन्यांनी दिलेल्या पॅकेजमध्ये सेवा पुरवत असल्याचे सांगत आहेत.
कॅशलेस वैद्यकीय विम्याची सुविधा न मिळाल्यामुळे पुण्यातील काही विमा ग्राहकांनी आयआरडीएकडे केलेल्या तक्रारी आणि दरम्यान खासदार अनिल शिरोळे यांनी केलेला माहिती घेण्याचा प्रयत्न या पाश्र्वभूमीवर ‘आयआरडीए’ने विमा कंपन्यांकडे विचारणा करायला सुरुवात केली असून आयआरडीए आणि विमा कंपन्या यांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेला पत्रव्यवहार ‘लोकसत्ता’ च्या हाती आला आहे. या पत्रांमध्ये विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पुण्यातील ४१ रुग्णालयांमध्ये ६२ वैद्यकीय उपचारांसाठी कॅशलेस सुरू असल्याचे वारंवार नमूद केले आहे. या ४१ रुग्णालयांच्या यादीतील निवडक रुग्णालयांशी संपर्क केला असता काही रुग्णालयांमध्ये किरकोळ विमा ग्राहकांना सेवा कॅशलेस मिळत नसून केवळ कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देत असल्याचे सांगण्यात आले, तर काही रुग्णालयांनी आपण केवळ आधी होकार दिल्यामुळे नाईलाजास्तव पॅकेज दरांमध्ये कॅशलेस सेवा देत आहोत असे सांगितले.
कॅशलेसच्या यादीत नोंद असलेल्या रुग्णालयांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रुग्णालये सोडता इतर सर्व लहान रुग्णालये आहेत. कॅशलेसच्या यादीत सहभागी होण्याबद्दल जेव्हा रुग्णालयांना विचारणा करण्यात आली तेव्हा वैद्यकीय उपचारांचे दर ठरवून देण्यात आले नव्हते, अशी माहिती ‘श्री हॉस्पिटल’चे प्रमुख डॉ. श्रीहरी ढोरे-पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘सुमारे वर्षभरापूर्वी आम्हाला या यादीत समाविष्ट होण्याबाबत विचारणा करण्यात आली होती व आम्ही होकारही दिला होता. उपचारांचे दर ऑक्टोबर २०१४ मध्ये आम्हाला कळवण्यात आले असून ते अत्यल्प आहेत. आमच्याकडे रुग्णांना सध्या सेवा कॅशलेस उपलब्ध आहे, मात्र त्यासाठी आम्हाला नुकसान सोसावे लागते. कॅशलेसबाबत अंतिम निर्णय काय होतो त्याकडे आमचे लक्ष आहे.’’
‘‘रास्त दरात चांगल्या रुग्णसेवा देऊ शकणाऱ्या रुग्णालयांनाच ‘जिप्सा- पीपीएन’च्या (प्रीफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रोत्साहित केले जात पुण्यातील ४१ रुग्णालये या यादीत आहेत. १ डिसेंबरनंतर यादीतील २ ते ३ रुग्णालयांनी पीपीएनमध्ये राहण्यास नकार दिला. इतर दहा रुग्णालयांना यादीत सहभागी व्हायचे होते परंतु उपचारांच्या दरावरून ते रखडले होते. ही रुग्णालये मोठी असून त्यांना आम्ही चर्चेअंती नवीन दर देऊ केले आहेत. ही रुग्णालये लवकरच कॅशलेसच्या यादीत येतील. अपघात व इतर वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रुग्णाला यादीत नसलेल्या रुग्णालयाकडूनही कॅशलेस सेवा मिळावी असे निर्देश आम्ही विमा अधिकाऱ्यांना तसेच ‘टीपीए’ला (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेटर) दिले आहेत.’’
– एन. बनचुर, उपव्यवस्थापक, नॅशनल इन्श्युरन्स कंपनी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा