जागेची उपलब्धता, मनुष्यबळ आणि आर्थिक बळ या तीन निकषांच्या आधारे आगामी साहित्य संमेलन डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी या संस्थेस देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये िपपरी-चिंचवड शहराला प्रथमच संमेलनाची यजमान संस्था होण्याचा बहुमान लाभला आहे.
८९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्यांच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
साहित्य महामंडळाच्या इतिहासात यंदाच्या संमेलनासाठी सर्वाधिक म्हणजेच १२ ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. िपपरी-चिंचवड भागातील डॉ. पी. डी. पाटील अध्यक्ष असलेली संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, आकुर्डी येथील महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, िपपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र साहित्य परिषद िपपरी-चिंचवड शाखा यांचे संयुक्त निमंत्रण अशी तीन निमंत्रणे होती. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बारामती शाखेसह मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा त्याचप्रमाणे िहगणी (नरसी नामदेव) शाखा, नायगाव बाजार (जि. नांदेड) येथील एज्युकेशन सोसायटी, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेअंतर्गत भालकी (जि. गुलबर्गा), डोंबिवली येथील आगरी युथ फोरम, श्रीगोंदा (जि. नगर) येथील अक्षर मानव चळवळ आणि अंमळनेर येथील मराठी वाङ्मय मंडळ या संस्थांनीही महामंडळाकडे निमंत्रण पाठविले होते. त्यामुळे संमेलनाचे निमंत्रकपद कोणाला मिळणार या विषयी साहित्य वर्तुळामध्ये उत्सुकता होती.
साहित्य महामंडळाच्या स्थळ निवड समितीने श्रीगोंदा, डोंबिवली आणि िपपरी-चिंचवड या तीन स्थळांना भेट दिली. उस्मानाबाद येथे गेल्या वर्षीच भेट दिली होती. स्थळ निवड समितीचा अहवाल महामंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. त्यावर विस्तृत चर्चा होऊन डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी या संस्थेला संमेलन देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे युवा संमेलन नुकतेच बारामती येथे घेण्यात आले होते. गेल्या वर्षी संमेलन झालेले घुमान आणि आता सप्टेंबरमध्ये विश्व साहित्य संमेलन होत असलेले अंदमान ही दोन्ही ठिकाणे लांब असल्यामुळे साहित्य रसिक संमेलनांपासून वंचित राहिले. हे ध्यानात घेऊनच जवळचे आणि मध्यवर्ती ठिकाण निवडण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader