तोंडावर आलेल्या परीक्षा, नोकरी यामुळे दिवाळीतही घरापासून लांब राहणाऱ्या विद्यार्थ्यांची दिवाळीही धूमधडाक्यात साजरी झाली. वसतिगृहांमध्येही दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहात होता.
पुण्यात मोठय़ा प्रमाणावर बाहेरगावाहून विद्यार्थी येत असतात. एरवी सुट्टय़ांच्या काळात वसतिगृहे ओस पडतात. मात्र, तरीही रेल्वेचे तिकीट मिळाले नाही, दिवाळी नंतर लगेच परीक्षा आहे, सुट्टी मिळाली नाही.. अशा अनेक कारणांमुळे वसतिगृहांमध्ये राहावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांनीही उत्साहाने दिवाळी साजरी केली. विद्यापीठ आणि महाविद्यालयांची वसतिगृहेही त्याला अपवाद ठरली नाहीत. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या आणि एकत्र राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींमुळे परंपरांची देवाण-घेवाणही दिवाळीच्या आनंदात भर टाकणारी होती.
याबाबत खासगी वसतिगृहात राहणाऱ्या नेहा भुले हिने सांगितले, ‘मी नागपूरची आहे. मला दिवाळीला घरी जाता आले नाही, पण आम्ही वसतिगृहातच दिवाळी साजरी करत आहोत. माझ्याबरोबर उडिसामधील मैत्रीण राहते. आम्ही दोघींनी एकमेकींच्या परंपरा एकत्र करून दिवाळी साजरी केली. घरून आलेला आणि काही विकत आणलेला फराळही होता. अजूनही अनेक मित्र-मैत्रिणी घरी जाऊ शकले नाहीत. आम्ही दिवाळीचे चारही दिवस एकत्र धमाल केली.’ बंगालमधील कृतिका हिने सांगितले, ‘मला घरी जाता आले नाही, पण मी माझ्या इथे राहणाऱ्या मैत्रिणींच्या घरी गेले. एक मैत्रीण जर्मनीहून आलेली आहे. तिच्याबरोबर किल्ले आणि दीपोत्सव पाहिले.’
विद्यापीठाच्या वसतिगृहांमध्येही अनेक विद्यार्थी राहात आहेत. परराज्यातील विद्यार्थ्यांबरोबरच त्यात काही दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थीही आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांनी या विद्यार्थ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. या विद्यार्थ्यांना फराळही देण्यात आला. विद्यापीठाच्या या कार्यक्रमात साधारण दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Story img Loader