विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुरेशा वसतिगृहांचे अभाव, विद्यार्थ्यांंना जागा भाडय़ाने देण्यासाठी रहिवाशी सोसायटय़ांनी टाकलेला दबाव यांमुळे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना तर अधिकच अडचणी येत आहेत.
राज्यातील सर्वाधिक अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालये, पारंपरिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये, प्रतिष्ठित स्वायत्त शिक्षण संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबरच इतर अभिमत विद्यापीठे असा पुण्यातील शिक्षण व्यवस्थेचा पसारा. त्याला अनेक संशोधन संस्था आणि विविध परीक्षांची तयारी करण्यासाठी क्लासेसची जोड यांमुळे पुण्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर बाहेरील विद्यार्थी येत असतात. अगदी अकरावीपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पुण्यात येत असतात. मात्र, बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे दिसत आहे.
विद्यार्थ्यांचे राहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे वसतिगृह. अनेक महाविद्यालये आणि शिक्षणसंस्थांमध्ये वसतिगृह आहेत. पण वसतिगृहांची प्रवेश क्षमता आणि बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यात खूपच फरक आहे. एखाद्या महाविद्यालयांत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण प्रवेश क्षमता असते, त्याच्या साधारण एक चतुर्थाश विद्यार्थीच वसतिगृहात राहू शकतात. अनेक महाविद्यालयांमध्ये वसतिगृहाची सुविधाच नाही. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी वसतिगृहांचाच पर्याय असतो. विद्यार्थ्यांपुढे दुसरा पर्याय असतो, तो ‘पेइंग गेस्ट’ म्हणून राहण्याचा किंवा भाडय़ाने घर घेऊन राहण्याचा. मात्र, अनेक रहिवाशी सोसायटय़ांमध्ये विद्यार्थ्यांना भाडय़ाने घर देण्यासाठी परवानगी नाही. सुरक्षा, विद्यार्थ्यांकडून होणारा त्रास अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांना घरे भाडय़ाने मिळण्यास अडचणी येतात.
परवडणाऱ्या जागाही कमी..
महाविद्यालयापासून किंवा क्लासपासून जवळ असलेल्या जागेला विद्यार्थी प्राधान्य देतात. त्याचबरोबर जेवणावळही जवळ हवी आणि जागेचे भाडेही परवडणारे हवे. मात्र, पुण्यातील राहण्याचा खर्च सर्वाधिक येत असल्याचे विद्यार्थी सांगतात. याबाबत निरंजन कोंडे या विद्यार्थ्यांने सांगितले, ‘लांब जागा असेल, तर जाण्या-येण्यात वेळ जातो, खर्चही वाढतो. महाविद्यालयाच्या वेळेत बस मिळतेच असे नाही. त्यामुळे राहण्याची जागा महाविद्यालयापासून जवळच असावी लागते. मात्र, डेक्कन, कोथरूड किंवा शहराच्या मध्यवर्ती भागांत अशा महाविद्यालयापासून जवळ असलेल्या परिसरात जागांचे भाडे खूप असते.’
वसतिगृहांत नियम अधिक..
वसतिगृहांमध्ये येण्या-जाण्याच्या वेळा, विजेवरील वस्तूंचा वापर यांबाबत नियम अधिक असतात. त्यामुळे भाडय़ाने जागा घेणेच विद्यार्थ्यांना सोयीचे वाटते. याबाबत मेहेर शुक्ल या विद्यार्थिनीने सांगितले, ‘महाविद्यालयाच्या वसतिगृहांत प्रवेश मिळवणेच कठीण आहे. त्याचबरोबर महाविद्यालयांत शिकत असताना परदेशी भाषा, नृत्य हेही शिकायचे आहे. महाविद्यालय, क्लास आणि इतर उपक्रमांच्या वेळा या वसतिगृहाशी जुळत नाहीत. वसतिगृहात राहायचे असेल, तर इतर छंद जोपासता येणार नाहीत असे वाटते.’
पॅरासाईट्सही अधिक..
वसतिगृहात जागा मिळत नाही आणि बाहेर राहणे परवडणारे नसते. असे अनेक विद्यार्थी अगदी विद्यापीठाच्या वसतिगृहापासून ते शहरांतील खासगी वसतिगृहांमध्येही पॅरासाईट्स म्हणून किंवा चोरून पोटभाडेकरू म्हणून राहतात. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होत आहेत.
विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा मिळेना!
पुरेशा वसतिगृहांचा अभाव, विद्यार्थ्यांंना जागा भाडय़ाने देण्यासाठी रहिवाशी सोसायटय़ांनी टाकलेला दबाव यांमुळे बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना तर अडचणी येत आहेत.
First published on: 14-08-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hostel problem