पुणे : शहरातील शासकीय वसतिगृहांमध्ये बाहेरून खाद्य मागविण्यास अद्याप नियमाने आडकाठी नसली, तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी वसतिगृहे करत आहेत. ऑनलाइन डिलिव्हरीच्या निमित्ताने घरात घुसून होणारे गैरप्रकार, तसेच या माध्यमातून बेकायदा वस्तू, पदार्थ पोहोचविण्याची शक्यता लक्षात घेऊन ही नियमावली तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोशी येथील शासकीय वसतिगृहात खाण्यासाठी बाहेरून पिझ्झा मागविल्याने, संबंधित विद्यार्थिनींचा वसतिगृहामधील प्रवेश एक महिन्यासाठी रद्द करण्याची नोटीस बजावून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून समज देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या पार्श्वभूमीवर, शासकीय वसतिगृहांचा आढावा घेतला असता, समाजकल्याण विभागाची वसतिगृहे वगळता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महापालिकेच्या वसतिगृहात बाहेरून खाद्य पदार्थ मागविण्यास आडकाठी नाही. मात्र, मोशी येथील घटनेनंतर वसतिगृहाच्या नियमावलीत ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबतचा नियम समाविष्ट करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

वसतिगृह व्यवस्थापनाकडून प्रामुख्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियम केलेले असतात. त्यात वसतिगृहातील वर्तणूक, वसतिगृहात येण्या-जाण्याच्या वेळा, सुविधांचा वापर, पालक-पाहुण्यांच्या भेटीच्या वेळा अशा नियमांचा समावेश असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत ऑनलाइन डिलिव्हरी ही सुविधाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याबाबतचा नियम आतापर्यंत नियमावलीत समाविष्टही करण्याचा विचार झाला नाही. मात्र, आता ही सेवा सुरू झाल्यानंतर आणि त्यातही ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडून गैरकृत्य घडल्याच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहे अधिक खबरदारी घेण्याच्या भूमिकेत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाचे नियम

‘मुलींच्या वसतिगृहात बाहेरून खाद्यपदार्थ मागवता येतात. मात्र, ते रात्रीच्या वेळेस मागवले असल्यास सुरक्षारक्षकांकडे ठेवले जातात. मुलींना थेट बाहेर येऊन पार्सल स्वीकारण्याची मुभा नाही. त्यांना ते सुरक्षारक्षकाकडून त्यांच्या खोलीत घेऊन जावे लागते. रात्री अकरा वाजेपर्यंत बाहेरून खाद्यपदार्थ मागवले जाऊ शकतात,’ अशी माहिती विद्यापीठाच्या मुख्य वसतिगृह प्रमुख प्रा. वर्षा वानखेडे यांनी दिली. अलीकडेच विद्यापीठात विद्यार्थ्यांकडे गांजा सापडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन डिलिव्हरी सेवेद्वारे काही आक्षेपार्ह वस्तू मागवल्या गेल्यास त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मोशी येथील घटनेच्या अनुषंगाने प्रा. वानखेडे म्हणाल्या, ‘पूर्वी ऑनलाइन डिलिव्हरी सेवा नसल्याने वसतिगृहाच्या नियमावलीत त्याबाबत नियम नव्हता. मात्र, आता नियम करण्याच्या अनुषंगाने चर्चा करून कार्यवाही केली जाणार आहे.’

समाजकल्याण विभागाचे संकेत काय?

‘समाजकल्याण विभागाच्या शाळा आणि वसतिगृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यासंदर्भात लेखी नियमावली नाही. मात्र, सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांनी काही संकेतांचे पालन करणे अपेक्षित आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दूध, नाश्ता आणि दोन वेळचे जेवण दिले जाते. बाहेरील खाद्यपदार्थांबाबत खात्री नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ते आणणे अपेक्षित नाही. मात्र, वाढदिवस किंवा अन्य काही कारणास्तव वसतिगृह आणि शाळांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आणायचे असल्यास खाद्यपदार्थ आरोग्याच्या दृष्टीने योग्य, ताजे आणि सकस असतील, अशी लेखी हमी द्यावी लागते. त्यानंतरच परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जातो. या संकेताचे काटेकोरपणे पालन केले जाते. मात्र, बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्याबाबत लेखी नियमावली करण्याचे विचाराधीन आहे,’ अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहआयुक्त प्रमोद जाधव यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या वसतिगृहांचे नियम

‘महापालिकेच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वसतिगृहात अनुपस्थित राहता येत नाही. काही कारणाने संबंधित विद्यार्थ्याला गैरहजर राहावे लागत असल्यास वसतिगृह प्रमुखाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी, तसेच पाहुण्यांनी रात्री आठ वाजेपर्यंत वसतिगृहातून बाहेर पडणे आवश्यक आहे. भेटण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही कारणास्तव वसतिगृहात राहता येत नाही,’ असे महापालिकेचे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले. ‘बदलत्या काळानुसार वसतिगृहात बाहेरील खाद्यपदार्थ मागवण्याची मुभा आहे. त्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी दिली जाते. विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तींनी त्यांची नोंद करणे बंधनकारक आहे. मुलांच्या वसतिगृहात, तसेच वसतिगृहाच्या परिसरात कोणत्याही महिलांना प्रवेश दिला जात नाही. खाद्यपदार्थ मागविल्यानंतर प्रवेशद्वाराजवळच ते घ्यावे लागतात. रात्री उशिरा बाहेरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वसतिगृहात सोडले जात नाही,’ असेही उदास यांनी स्पष्ट केले.