दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : सियाचीन या जगातील सर्वांधिक उंचीवरील आणि उणे ७० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अत्यंत खडतर युद्ध भूमीवर देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या जवानांसाठी हेल्मेटच्या आत डोक्यावर घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गरम टोप्या पुण्यातून रवाना झाल्या आहेत. हा उपक्रम पुण्यातील सहवर्धन समूहाने राबविला आहे.

सियाचीन ही भारत-पाकिस्तान सीमेवरील जगातील सर्वाधिक उंचीवरील आणि सर्वाधिक थंड युद्ध भूमी आहे. वजा ७० अंश सेल्सिअस तापमानात हजारो जवान अखंड देशसेवा बजावतात. या जवानांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खास पोषक तयार करण्यात येतो. हेल्मेटच्या आत डोक्यावर घालण्यात येणाऱ्या टोप्याही दर्जेदार असतात. हिरव्या रंगाच्या आणि उच्च प्रतीच्या मरीनो लोकरीपासून तयार केल्या जातात. पंजाबमधील एका देशप्रेमी नागरिकाने ही लोकर विकत घेऊन, स्वच्छ करून पुण्यात पाठवली होती. त्या मरीनो लोकरीपासून पहिल्या टप्प्यात विणकाम करून फक्त १५० टोप्या पाठवायच्या होत्या. सहवर्धन समूहातील महिलांच्या परिश्रमातून अगदी थोड्या दिवसांत ५०० टोप्या तयार झाल्या. या सर्व टोप्या नुकत्याच सियाचीनला पाठविण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा-कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता

या पूर्वी सहवर्धन समूहाने २०२१मध्ये गलवान खोऱ्यात चीन विरोधात लढणाऱ्या मराठा लाईट इंन्फट्रीच्या जवानांसाठी सैन्याच्या मागणी आणि निकषांनुसार १५०हून जास्त मफलर तयार करून पाठविल्या होत्या.

अपंग ज्येष्ठ महिलेचे योगदान

करोनापूर्वी १९१९मध्ये डॉ. राम दातार यांनी बागकाम प्रेमी नागरिकांचा सहभाग असलेला सहवर्धन, हा व्हाटस्अप ग्रुप स्थापन केला होता. करोना काळात डॉ. स्मिता बुगदे यांनी पुढाकार घेऊन सहवर्धनमधील विणकामाची आवड असणाऱ्या महिलांना एकत्र करून छंदानंद हा उपसमूह स्थापन केला. गलवान खोऱ्यातील जवानांसाठी मफलर तयार करावयाचे असल्यामुळे छंदानंद समूहातील महिलांना विणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले. आता पाचशे टोप्या अत्यंत कमी वेळात तयार झाल्या. या पाचशे टोप्यांमधील तब्बल १५० टोप्या अंपग असलेल्या आदिती वळसंगकर यांनी तयार केल्या आहेत.

आणखी वाचा-पुणे : ऐन दिवाळीच्या मुर्हतावर सराफी व्यावसायिकावर गोळ्या झाडून सोन्याची लूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढेही काम करीत राहू

सहवर्धन समूहात पुण्यातील समाजभान जपणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. समूहातील महिला केवळ देशप्रेमापोटी विणकामांत पारंगत झाल्या आहेत. आम्ही २०२१मध्ये गलवान खोऱ्यातील जवानांसाठी मफलर तयार करून पाठविले होते. आता सियाचीनमधील जवानांसाठी टोप्या तयार करून पाठविल्या आहेत. या पुढेही जवानांसाठी काम करीत राहू, असे डॉ. राम दातार म्हणाले.