कोथरूडमधील ‘आशीर्वाद डायनिंग हॉल’ मध्यंतरी काही महिने बंद होता. अलीकडेच चांगली बातमी समजली, की ‘आशीर्वाद डायनिंग हॉल’ पुन्हा सुरू झालाय. गोपाळशेठ पै यांनी हा डायनिंग हॉल सुरू केला होता. नव्याने दमानं सुरू झालेला ‘आशीर्वाद डायनिंग हॉल’ एकदम चकाचक झाला आहे आणि आतील टेबल-खुच्र्याची रचनाही लक्षणीय आहे. डायनिंग हॉल असल्यामुळे दोन-दोन जण एका टेबलवर बसू शकतील अशी आणि चार-चार जण एकत्र बसू शकतील अशी दोन्ही प्रकारच्या टेबल-खुच्र्याची रचना इथे बघायला मिळाली. साधारण चाळीस जण एका वेळी इथे भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात. केटरिंग व्यवसायातील गेल्या दहा वर्षांच्या अनुभवातून हेमंत राजवाडे हे त्यांचा मित्र सुबोध थिटे याच्याबरोबर ‘आशीर्वाद डायनिंग हॉल’ चालवत आहेत.

पारंपरिक चवीचं मराठी भोजन ही ‘आशीर्वाद’ची अनेक वर्षांची खासियत होती. तीच खासियत नव्या रचनेतही जपण्यात आली आहे. शिवाय, ग्राहकांचा विचार करून आणि त्यांच्या मागणीनुसार आणखी काही नव्या गोष्टींचीही भर इथे पडली आहे. एक सुकी भाजी, एक उसळ, आमटी, चार पोळ्या, भात, कोशिंबीर, कांदा, लिंबू, पापड आणि ताक हे इथल्या थाळीतील रोजचे पदार्थ. त्यातील चार पोळ्या आणि पापड हे मर्यादित तर इतर पदार्थ अमर्यादित स्वरूपात वाढले जातात. ही पोटभर थाळी इथे नव्वद रुपयांना मिळते. स्वच्छता, टापटीप, जलद सेवा ही इथली वैशिष्टय़ं लगेचच लक्षात येतात.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
mahakumbh 2025 kumbh mela kicks off with paush poornima in prayagraj
‘महाकुंभ’ आज पासून ; पौष पौर्णिमेनिमित्त पहिले शाही स्नान; ४५ दिवस प्रयागराजमध्ये भक्तांचा महासागर
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग

रोजच्या थाळीतील पदार्थाशिवाय दर रविवारी सकाळी मसालेभात, अळूची भाजी आणि एक गोड पदार्थ यांचा थाळीत समावेश असतो. ही थाळी एकशेवीस रुपयांना दिली जाते. फक्त अळूची भाजी ‘पार्सल’ घेऊन जायला रविवारी सकाळी इथे मोठी गर्दी असते. तसंच दर शुक्रवारी सायंकाळी पालकाची ताकातली भाजी आणि वांग्याचं भरीत हा बेत ठरलेला आहे. रोज दोन्ही वेळा थाळीतील पदार्थ बदलले जातात. दुपारच्या जेवणातला कोणताही पदार्थ सायंकाळी नसतो. शिवाय श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम, बासुंदी, रबडी आदी गोड पदार्थ प्रत्येकी तीस रुपये देऊन इथे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो.

प्रत्येक पदार्थाच्या चवीचं वैशिष्टय़ं जपण्याचा प्रयत्न ‘आशीर्वाद’मध्ये आवर्जून केला जात असल्याचं आपल्याला जाणवतं. त्यामुळे सरधोपट मसालेदार, तेलकट, जळजळीत, चमचमीत अशी चव इथल्या पदार्थाना नाही. मुळात राजवाडे आणि थिटे हे दोघेही कोकणातून आलेले. ते देवरुखचे. त्यांच्याकडचे आचारीही कोकणातलेच आहेत. कोकणातील मंडळींनी केलेल्या पदार्थाची चव काही वेगळीच असते. पदार्थ तयार करताना ते सढळपणे तेल, तिखट वापरत नाहीत. तेल-तिखटाच्या वापरावर त्यांचा हात तसा कमीच असतो. त्याऐवजी गोडा मसाला आणि ओल्या खोबऱ्याचं वाटण यांचा वापर ते अधिक करतात. त्यामुळे पदार्थ चविष्ट होतात; पण ते जळजळीत किंवा चमचमीत नसतात.

अशा घरगुती चवीच्या भाज्या, आमटी यांचा आस्वाद घेण्यासाठी ‘आशीर्वाद’मध्ये जायलाच हवं. कोशिंबिरींमध्येही इथे वेगळेपण आहे. कधी भोपळ्याचं भरित, कधी कोबीची पचडी, कधी कोबी-डाळिंब यांची दह्य़ातली कोशिंबीर, कधी फोडणी घातलेली कोशिंबीर, कधी वांग्याचं भरीत असं वैविध्य असतं. उसळींमध्येही मूग, मटकी, चवळी यासह सर्व कडधान्यं आलटून पालटून असतात. डायनिंग हॉलमध्ये जे नियमितपणे जातात, त्यांचं लक्ष तिथल्या पोळीवर असतं. ‘आशीर्वाद’मध्ये गरम गरम आणि मोठय़ा आकाराची पोळी मिळते. ती उत्तम प्रतीची व्हावी यासाठी तयार आटा न घेता गहू आणून ते दळून त्या कणकेच्या पोळ्या इथे केल्या जातात. त्यामुळे त्या उत्तम असतात, हे वेगळं सांगायला नकोच.

हॉटेल व्यवस्थापनची पदविका घेतल्यानंतर हेमंत राजवाडे यांनी पुण्यात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये कामाचा अनुभव घेतला. तो घेत असतानाच त्यांनी स्वत:चा केटरिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यात चांगला जम बसल्यानंतर त्यातील दहा वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आता बालपणापासूनचा मित्र सुबोध बरोबर डायनिंग हॉलच्या नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. हेमंत हे उत्तम छायाचित्रकार आहेत आणि विशेष म्हणजे कोणतंही औपचारिक शिक्षण वगैरे न घेता केवळ अनुभवातून शिकत शिकत, अनेक ठिकाणी पर्यटन करत छायाचित्रणकलेत त्यांनी ठसा उमटवला आहे.

त्यांच्या या कलेचं प्रत्यंतर आपल्याला ‘आशीर्वाद’मध्येही येतं. त्यांची काही छायाचित्रं आपल्याला इथे पाहायला मिळतात. छायाचित्रणकला, चित्रकला आदी कलांमध्ये प्रवीण असणाऱ्या हेमंत यांची पाककला अनुभवण्यासाठी ‘आशीर्वाद’ची भेट अपरिहार्य ठरावी.

कुठे आहे..

  • कोथरूडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ
  • युको बँकेशेजारी रोज सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन
  • सायंकाळी साडेसात ते रात्री अकरा
  • बुधवारी बंद

 

 

Story img Loader