पुणे : सिंहगड रस्ता भागात वडगाव परिसरात एका हॉटेलमधील वेटरचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. वेटरचा खून वादातून झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. सुनीलकुमार राम आसरे (वय २५, रा. चमका बनी, हरदोई, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. याबाबत सुशीलकुमार (वय २५, रा. गंगाई हाईट्स, आंबेगाव बुद्रुक) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलकुमार आणि सुशीलकुमार नातेवाईक आहेत.
हेही वाचा >>> पिंपरी चिंचवडकरांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधांसाठी आता कृती आराखडा
दोघे जण आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका हाॅटेलमध्ये कामाला आहेत. वडगाव बुद्रुक परिसरात दांगट शाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागेत सुनीलकुमार मृतावस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीलकुमारच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. सुनीलकुमारच्या खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत वादातून त्याचा खून झाल्याची माहिती मिळाली असून, पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने तपास करत आहेत.