लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
‘संवाद व्यावसायिकांशी’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयुक्त सिंह यांनी शहरातील हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त अजय चारठणकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे, सहायक आयुक्त रविकिरण घोडके, विजयकुमार थोरात यांच्यासह पिंपरी-चिंचवड हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचे अध्यक्ष पद्मनाथ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे उपस्थित होते. शहराच्या विकासामध्ये हॉटेल व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. हॉटेलला शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यात येईल. हॉटेलच्या परिसरात असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त सिंह यांनी दिली.
आणखी वाचा- पिंपरी महापालिकेच्या सहशहर अभियंत्याला महापालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस
हॉटेल व्यावसायिकांच्या शंकाचेही आयुक्तांनी निरसन केले. हॉटेल व्यवसायामध्ये तृतीयपंथी समूहातील नागरिकांना सामावून घेऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असोसिएशनच्या वतीने मांडण्यात आला. त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.