दुष्काळी भागांतील तरूणांना हॉटेल व्यावसायिकाचा हात
मराठवाडय़ातील जीवघेण्या दुष्काळाच्या कथांनी अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे केले, काही जण चुकचुकले, काही जणांनी आपल्यापरीने मदत केली, कुणी अगदी करोडो रुपयांचा निधीही दिला. मात्र दुष्काळी कुटुंबातील तरूणांना नोकरी देऊन त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उभे करण्याचा प्रयत्न डेक्कन भागातील ‘गरिमा’ हॉटेल करत आहे.
डेक्कन भागातील ‘गरिमा’ लॉजमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी हे दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडय़ातील आहेत. हा काही योगायोग नाही, तर मुळात मराठवाडय़ातूनच आलेल्या लॉजच्या व्यवस्थापकांनी जाणीवपूर्वक दुष्काळी भागांतील तरुणांना येथे नोकरी दिली आहे. तसे हे हॉटेल काही खूप मोठे नाही. त्यामुळे येथील मनुष्यबळाची गरजही मर्यादितच आहे. मात्र, आर्थिक मदत करण्यापेक्षा नोकरी दिली, तर त्याने संपूर्ण कुटुंब उभे राहू शकते. गावाकडे शेती सांभाळताना उत्पन्नाचा अधिक एखादा स्रोत काही कुटुंबांसाठी तयार होऊ शकतो. नवे काही करता येते का हे आजमावण्याची संधी तरूणांना मिळू शकते, या विचाराने हॉटेल सुरू करताना जाणीवपूर्वक दुष्काळी भागांतील तरूणांचीच निवड करण्यात आली आहे.
संतोष कुकडे हे या हॉटेलचे व्यवस्थापक, तर संजय इंगळे हे मालक आहेत. कुकडे हे मूळचे परभणीचे. त्यामुळे त्या भागांतील गरजांची आणि समस्यांची जाणीव असणारे. याबाबत कुकडे यांनी सांगितले, ‘‘माझे गाव दुष्काळी आहे. मी काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पुण्यात आलो. मला सावरण्याची संधी मिळाली. मी लाखो रुपयांची आर्थिक मदत तेथील गावांना देऊ शकत नाही. मग काय करता येईल असा विचार करताना थेट आर्थिक मदत नाही, तरी नोकरी देऊ शकतो असा विचार आला. हॉटेल नवीन आहे, त्यामुळे मुळात भरती करतानाच दुष्काळी भागांतील गरजू तरूणांची निवड केली. यानंतर यातील कुणी सोडून गेले, कुणाला चांगली संधी मिळाली, तर त्या जागी पुन्हा एखाद्या गरजूलाच संधी दिली जाईल. या माझ्या कल्पनेला हॉटेलचे मालक इंगळे यांनीही पाठिंबा दिला.’’ या हॉटेलमध्ये ९ कर्मचारी आहेत. हे कर्मचारी साधारण २० ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. यातील सात जणांची गावाला शेती आहे. नापिकीमुळे शेतीचे उत्पन्न काहीच नाही. तीन कर्मचारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करत आहेत. महिन्याला सरासरी ८ ते १० हजार रुपये पगार या कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र त्याचबरोबर राहणे आणि जेवणाचीही सोय होते. त्यामुळे आपला खर्च भागवून गावातील घरीही थोडी आर्थिक मदत करणे त्यांना शक्य होते आहे. त्या मदतीवर या कर्मचाऱ्यांची कुटुंबेही उभी राहिली आहेत.