पिंपरी : ‘चिखलीत भरलेल्या सिलिंडरमधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरून चढ्या दराने विक्री करण्याचा प्रकार तीनवेळा घडला आहे. काही हॉटेल व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे घरगुती गॅसचा वापर केला जात आहे. शासनाकडून तपासणी पथक नेमून अशा ठिकाणांवर वेळाेवेळी छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील गॅसच्या काळ्या बाजाराबाबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला. चिखलीत गॅसचा काळा बाजार झाला आहे का, अवैधरित्या गॅस भरल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धाेका निर्माण हाेत असून, त्यावर काय कारवाई केली जात आहे, अशी विचारणा केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी लेखी उत्तर दिले आहे. ‘चिखलीत गॅसचा काळाबाजार करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी दाेषींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईसाठी शासनाकडून तपासणी पथक नेमले जातात. अशा ठिकाणांवर वेळाेवेळी छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात येतात. राेजगारासाठी परराज्यांतून आलेल्या कामगारांना गॅस एजन्सीकडून छाेट्या आकाराचे गॅस सिलिंडर बाजारामध्ये उपलब्ध करून दिले जातात. हॉटेल व्यावसायिकांनी अनधिकृतपणे घरगुती सिलिंडर वापरणे, गॅस चाेरी, काळा बाजार करणाऱ्यांंविराेधात तपासणी माेहीम आखून कारवाई केली जाते.
यासंदर्भात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याद्वारे परिमंडळ अधिकारी आणि गॅस एजन्सीची बैठक घेऊन निर्देश देण्यात आले आहेत. दाेषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. याबाबत वेळाेवेळी कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या जात आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.