पुणे : पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या नागरिकांच्या प्रवासात बुधवारी तांत्रिक बिघाडाचे विघ्न आले. तळेगावनजीक ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने डेक्कन क्वीनसह इतर गाड्या सकाळी तासाभरासह अधिक काळ थांबविण्यात आल्या. याबाबत प्रवाशांना कोणतीही सूचना न देण्यात आल्याने गोंधळ उडाला. बिघाड दुरूस्त झाल्याने अखेर गाड्या पुढे मुंबईकडे मार्गस्थ झाल्या परंतु, या संपूर्ण प्रकाराबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-मुंबई मार्गावर भेगडेवाडी ते तळेगाव या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. यामुळे सकाळी पावणेआठपासून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या तळेगावजनीक थांबवून ठेवण्यास सुरूवात झाली. यात पुणे-मुंबई नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या पसंतीची डेक्कन क्वीन सर्वप्रथम अडकली. त्यानंतर पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, सिंकदराबाद -मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि पुणे लोणावळा लोकल या गाड्या अडकल्या.

हेही वाचा – विद्यापीठांनी एम.फिल.चे प्रवेश थांबवण्याचे आदेश यूजीसीने का दिले?

या गाड्यांमधील प्रवाशांना त्या थांबविण्याबाबत कोणतीही सूचना रेल्वेकडून देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ वाढला. नेमकी परिस्थिती समजत नसल्याने अनेक प्रवाशांनी समाजमाध्यमावर याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारणा केली. त्यावरही रेल्वे प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कळविण्यात आले असून, तातडीने कार्यवाही केली जाईल, असे थातुरमातुर उत्तर प्रवाशांना समाजमाध्यमावर दिले. अखेर ओव्हरहेड वायरमधील बिघाड दूर झाल्यानंतर या गाड्या मुंबईकडे मार्गस्थ झाल्या.

डेक्कन क्वीन ही व्हीआयपी एक्स्प्रेस गाडी असल्याचे केवळ बोलले जाते. ही गाडी तळेगावनजीक सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपासून थांबविण्यात आली. यासाठी कोणतेही कारण देण्यात आले नाही. प्रवाशांना कोणतीही सूचना न देता हा प्रकार सुरू होता. हे सर्व कसे घडू शकते याचे उत्तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी द्यावे. – भालचंद्र कुलकर्णी, प्रवासी

हेही वाचा – पुणे : विमाननगर हादरले; एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट

पुणे-मुंबई मार्गावर अडकलेल्या गाड्या

  • डेक्कन क्वीन – सुमारे ८० मिनिटे
  • प्रगती एक्स्प्रेस – सुमारे ४५ मिनिटे
  • सिंकदराबाद-मुंबई एक्स्प्रेस – सुमारे २० मिनिटे
  • पुणे-लोणावळा लोकल – सुमारे २५ मिनिटे
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hourly latemark for pune mumbai railway overhead wire failure causes delays pune print news stj 05 ssb
Show comments