पुणे : देशात घरांची खरेदी दिवसेंदिवस महागत चालली आहे. देशभरात गेल्या दोन वर्षांत घरांच्या किमती सरासरी २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. घरांच्या किमतीत बंगळुरू, दिल्ली, कोलकता या महानगरांमध्ये तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. याचवेळी मुंबईत २ टक्के आणि पुण्यात २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, क्रेडाई कॉलियर्सच्या अहवालातून समोर आले आहे.
क्रेडाई, कॉलियर्स आणि लियासेस फोरास यांनी देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशातील प्रमुख महानगरांत २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये घरांच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. बंगळुरू, दिल्ली आणि कोलकता या महानगरांमध्ये घरांच्या किमती सर्वाधिक ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. घरांची वाढलेली मागणी, आलिशान घरांना अधिकाधिक ग्राहकांची पसंती यामुळे किमतीत वाढ नोंदविण्यात आली आहे. बांधकामाचा खर्च वाढल्याने विकसकांनी हा खर्च किमती वाढवून भरून काढला आहे.
हेही वाचा – लोकजागर : वाहतुकीचे तीन तेरा
देशातील एकूण विक्री न झालेल्या घरांचा साठा २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्येही कमीच राहिला. नवीन घरांचा पुरवठा वाढूनही विक्री न झालेल्या घरांच्या साठ्यात वाढ झालेली दिसून आली नाही. महानगरांमध्ये २०२२ आणि २०२३ मध्ये प्रामुख्याने मध्यम आकाराच्या आणि आलिशान घरांचे प्रकल्प दिसून आले. मागील दोन वर्षांत बंगळुरू, हैदराबाद, कोलकता, मुंबई आणि पुणे या महानगरांमध्ये नवीन घरांच्या पुरवठ्यात दुप्पट ते अडीचपट वाढ नोंदविण्यात आली, असे अहवालात म्हटले आहे.
ग्राहकांकडून घरांना वाढत असलेली मागणी घरांच्या किमती वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. त्यातही मध्यम आकाराच्या आणि आलिशान घरांना अधिक पसंती मिळत असल्यानेही किमती वाढल्या आहेत. बांधकामाच्या खर्चात वाढ झाल्याचे कारणही किंमत वाढण्यामागे आहे. – बोमन इराणी, अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल
घरांच्या किमतीतील वाढ (प्रति चौरस फूट)
शहर – सरासरी किंमत २०२१ – सरासरी किंमत २०२२ – सरासरी किंमत २०२३
मुंबई – १९,६५७ – १९,२८७ – २००४७
पुणे – ७३९८ – ८३७९ – ९१८५
अहमदाबाद – ५७२१ – ६२०३ – ६७३७
बंगळुरू – ७६०९ – ८२७६ – ९९७६
चेन्नई – ७१८२ – ७४४५ – ७७०१
दिल्ली – ६९५८ – ८३९४ – ९१७०
हैदराबाद – ८८२१ – १००९० – ११०८३
कोलकता – ६०८१ – ७१४४ – ७९१२